प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांनी झाकोळले
By Admin | Published: December 9, 2014 01:09 AM2014-12-09T01:09:21+5:302014-12-09T01:24:23+5:30
जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते.
अजित जाधव- महाबळेश्वर -जावली म्हणजेच जयवल्ली. ‘येता जावली जाता गोवळी’ म्हणून मिरवली गेलेली चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोऱ्यांची राजधानी. शिवरायांनी ज्याचा बीमोड केला, जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते. याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. अशा या छत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांच्या जाळ्यात झाकोळले.
दरवर्षी लाखोंच्या सख्येने पर्यटक व शालेय सहली प्रतापगडला भेट देतात. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अवघे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी चार तास लागतात. वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड हा रस्ता १९५७ मध्ये बनविण्यात आला होता. त्यावेळी आतासारखी वाहतूक नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. यासाठी २०१३ मध्ये ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप कामास सुरुवात नाही.
प्रतापगडावर १६६१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते भवानीमातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राज्याभिषेकापूर्वी शिवराय भवानीच्या दर्शनासाठी आले. १९ मे १६७४ रोजी त्यांनी ५६ हजारांचे सुवर्णछत्र अर्पण केले होते. किल्ल्यावर पश्चिम भागात कडेलोट पॉर्इंट आहे. तेथून रायगड जिल्ह्यातील खेडी दिसतात. ध्वजा बुरुज, तलावाचा बुरुज, अफजल खान बुरुज, रेडका बुरुज, यशवंत बुरुज, केदारेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, चोरवाटा, दरबारी जागा, पाण्याची तळी हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
पंडित नेहरुंच्या हस्ते उभारला पुतळा
प्रतापगडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला.
त्यानंतर वनविभागाने पुतळा परिसरात बागबगीचा तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
गडाच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळावर शंभर ते दीडशे वाहने उभी राहू शकतात. मात्र, पर्यटकांचा हंगाम असेल त्यावेळी गडावर तीनशे ते चारशे वाहने दाखल होतात. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. वाहनतळाची जागा ही वनविभागाकडे असल्याने येथे वाहनतळ वाढविण्यास जागा मिळत नाही.