केवळ बापूंच्या स्मरणासाठी ९२ वर्षांपासून पलंगाची देखभाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:07 PM2019-10-02T12:07:45+5:302019-10-02T12:14:19+5:30
महात्मा गांधींनी घेतली होती बैठक; वळसंगच्या तिसºया पिढीतील मेलकेरी कुटुंबाची अशीही सेवा
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे फक्त भारतच नाही तर जगभर आदर्श म्हणून पाहिले जाते. अशा आदर्श महात्म्याची आठवण आपल्याकडे असणे हे भाग्याचे समजले जाते. मात्र, दक्षिण सोलापुरातील वळसंंग येथे महात्मा गांधी यांनी बसलेला पलंग आता सांभाळणे कठीण जात असून, शासनाने तो आपल्या ताब्यात घ्यावा, अशी विनंती राजशेखर मेलकेरी यांनी केली आहे.
नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत करून स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान द्यावे, यासाठी महात्मा गांधी हे भारत भ्रमण करत होते. याचाच एक भाग म्हणून ते दक्षिण सोलापुरातील वळसंग येथे २७ फेब्रुवारी १९२७ मध्ये आले होते. शंकरलिंग मंदिरासमोरील कट्ट्यावर उभे राहून त्यांनी सभेला मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणामुळे गावात अनेक क्रांतिकारक तयार झाले. त्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले, अशी माहिती (कै.) स्वातंत्र्य सैनिक मल्लप्पा बिदरे यांची मुलगी गौराबाई बिदरे यांनी दिली. महात्मा गांधी यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी एक फलक देखील लावण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतो.
शंकरलिंग मंदिर येथे होणाºया बैठकीआधी महात्मा गांधी यांनी राचप्पा मेलके री यांच्या घरी बैठक घेतली होती. या बैठकीत सुमारे ३० नागरिक उपस्थित होते. या बैठकीत महात्मा गांधी हे एका पलंगावर बसले होते. महात्मा गांधी यांची आठवण म्हणून मागील तीन पिढ्यांपासून मेलकेरी कुटुंबीय या पलंगाची काळजी घेत आहेत. आता त्यांचा वाडा जुना झाला असून, तो केव्हाही कोसळू शकतो. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केला असून, त्याची वाट पाहत असल्याचे राजशेखर मेलकेरी यांनी सांगितले.
इंग्रजांनी वाड्यातील वस्तू फेकल्या रस्त्यावर
- महात्मा गांधी हे मेलकरी वाड्यात येऊन गेल्याची माहिती इंग्रजांना मिळाली होती. यानंतर त्यांनी या वाड्यातील वस्तू बाहेर फेकल्या. वाड्यातील काही हत्यारे, तिजोरीतील दागिने हस्तगत केले. तसेच वाड्याची मोडतोडही केली. आठवडाभर गावात तणाव होता. गावातील काही लोक गाव सोडून परागंदा झाले होते. इंग्रजांनी फोडलेली तिजोरी आजही मेलकरी वाड्यात आहे.
महात्मा गांधी व आजोबांची आठवण म्हणून हा पलंग इतके दिवस जपून ठेवला. या पलंगाशी आमच्या कुटुंबीयांच्या भावना जुळलेल्या आहेत. मी जोपर्यंत जिवंत असेन तोपर्यंत या पलंगाची काळजी घेईन, माझ्यानंतरही हा वारसा जतन व्हावा, असे वाटत असल्याने शासनाने हा पलंग ताब्यात घ्यावा, अशी माझी विनंती आहे. यासाठी मला कोणताही मोबदला नको आहे.
- राजशेखर मेलकेरी, मेलकेरी वाड्याचे मालक