काय सांगता! चक्क मधमाशांसह बाईकवरून ५ किमी अंतर कापले; पहिल्यांदाच रेस्क्यू केले
By शीतलकुमार कांबळे | Updated: March 18, 2023 13:55 IST2023-03-18T13:54:48+5:302023-03-18T13:55:12+5:30
सातव्या मजल्यावरील आगी मोहोळाचे रेस्क्यू ऑपरेशन, किट घालून पाच तासांचे बचाव कार्य, वन विहारात स्थलांतर

काय सांगता! चक्क मधमाशांसह बाईकवरून ५ किमी अंतर कापले; पहिल्यांदाच रेस्क्यू केले
सोलापूर - आत्तापर्यंत प्राणी व पक्षांचे रेस्क्यू ऑपरेशनबाबत आपण ऐकले. पण, मधमाशांचे रेस्क्यू करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविले जाण्याचे प्रकार कानावर पडत नाहीत. सोलापुरातील अंत्रोळीकर नगर येथे सातव्या मजल्यावरील मधमाशांचे मोहोळ पाच तासांच्या परिश्रमानंतर हलविण्यात आले.
अंत्रोळीकर नगर येथील एका अपार्टमेंटच्या सातवा मजल्यावर फरहान इनामदार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये २० दिवसांपासून मोहोळ लागले होते. या मोहोळात अंडी होत्या. या मोहोळाला जाळून किंवा केमीकल टाकून काढता येऊ शकले असते. पण, तसे न करता इनामदार कुटुंबियांनी याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला दिली. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, पप्पू जमादार, तरुण जोशी, आदित्य घाडगे यांनी बचावकार्य पार पाडले.
असे हलविले मोहोळ
एका पुठ्ठ्याने हळूवारपणे पोळे काढत ते बॉक्समध्ये ठेवण्यात आले. काही वेळात मधाच्या पोळ्यांसह मधमाशा बॉक्समध्ये आल्या. त्यानंतर बॉक्समध्ये हवा जाण्यासाठी थोडी जागा सोडून बॉक्स चिकटपट्टीने बंद करण्यात आला. बाईकवरून मधमाशांचा बॉक्स पाच किलोमीटर अंतरावरील सिद्धेश्वर वन विहार येथे नेण्यात आला. तिथे पाण्याची टाकी असलेल्या थंड ठिकाणी उंचीवर बॉक्स उघडून पोळे ठेवण्यात आले. काही दिवसात मधमाशी दुसरीकडे जागा पाहून नवीन पोळे तयार करतील, असे भरत छेडा यांनी सांगितले.