पोलीस गाडीत बीअर पार्टी; कॉन्स्टेबलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:30 AM2020-04-08T11:30:34+5:302020-04-08T11:33:09+5:30
'केतन' चा उपद्व्याप चालकाला भोवला; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका
सोलापूर : कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात, चक्क जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस गाडीत बसुन बिअर पिताना व बिर्याणी खातानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल सह तिघांविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल विनोद सूर्यकांत दंतकाळे (नेमणूक मोटार परिवहन विभाग, पोलीस आयुक्तालय), केतन श्रीकांत कसबे (रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट सदर बझार), राहुल गेनबा शिंदे (रा. टिकेकरवाडी होटगी रोड सोलापूर), सुमेध अशोक वाघमारे (रा.मल्लिकार्जून नगर, यशराज नगर अक्कलकोट रोड सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. केतन कसबे याने संचारबंदी असताना पोलीस गाडीतुन फिरताना, बिअर पिताना व बिर्यानी खातानाच्या व्हिडीओचे फेसबुकवरून लाईव्ह केले होते.
हा प्रकार फेसबुकवर पाहिल्यानंतर सर्वांना अश्चर्याचा धक्का बसला. चक्क पोलीस गाडीत बसुन हा प्रकार घडत असल्याचे पाहुन अनेकांनी कमेंटस देखील केले. हा प्रकार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या लक्षात आला. केतन कसबे याचा शोध घेऊन सदर बझार पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत केतन कसबेने लाईव्ह केलेली पोलीस गाडी ही जेलरोड पेलीस ठाण्याची असल्याचे सिद्ध झाले.
चौकशीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल विनोद दंतकाळे हे जेलरोड पोलीस ठाण्याची पीसीआर-२ बोलेरो जीप (क्र. एम एच १३ पी 0२५८) वर ड्युटीवर होते. संचारबंदीत ते दि.६ एप्रिल रोजी सकाळी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ड्युटीवर होते. दरम्यान अशोक चौकी येथून जेलरेड पोलीस ठाणे हद्दीच्या बाहेर गेले. सोबत मित्र केतन कसबे, राहुल शिंदे, सुमेध वाघमारे सोबत होते. स्वत: पोलीस कॉन्स्टेंबल विनोद दंतकाळे व त्याचे तिन मित्र शहरातील विविध भागातुन फिरून अक्कलकोट रोडवरील गोपाळनगर येथील विटाचे बांधकाम असलेल्या ठिकाणी गेले. तेथे दारू प्राशन करून जेवण केले हा सर्व प्रकार केतन कसबे याने स्वत:च्या फेसबुकवर लाईव्ह केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौघांविरूद्ध भांदवि कलम १८८, २६९, ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक जे.एन. मोगल करीत आहेत.
बिअरची बाटली आणि बिर्याणी आली कोठून?
संचारबंदीच्या काळात सर्व हॉटेल्स, वाईनशॉप व बिअरशॉप बंद आहेत. असे असताना या महाभागांना बिर्याणी आणि बिअर कोठून मिळाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद काळात याची कुठे विक्री केली जात आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.