"लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना आवरा अन्यथा..."
By राकेश कदम | Published: October 10, 2023 02:23 PM2023-10-10T14:23:46+5:302023-10-10T14:42:13+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही या नेत्यांनी केली.
सोलापूर - लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना आवरा, त्यांच्या वक्तव्यांना लगाम घाला, असा इशारा मोहिते पाटील गटाचे उपाध्यक्ष आणि सात तालुका अध्यक्षांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही या नेत्यांनी केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आहे. मोहिते पाटील आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद सुरू असतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमावा अशी मागणी केली होती. ही मागणी म्हणजे धवलसिंह मोहिते पाटील यांना शह प्रयत्न असल्याची चर्चा झाली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सांगोला तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, मंगळवेढ्याचे प्रशांत साळे, मोहोळचे सुलेमान तांबोळी यांच्यासह सात जणांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे ग्रामीण भागातील राजकारणाकडे लक्ष न देता शहरात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना अशी वक्तव्ये करणे पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते. नरोटे यांच्या विरोधात आम्ही सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना भेटणार आहोत, असेही हत्तूरे आणि कांबळे यांनी सांगितले.