साखर कारखान्याचा पट्टा आठ दिवसात पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:31 AM2021-02-26T04:31:56+5:302021-02-26T04:31:56+5:30
करमाळा : तालुक्यातील उसाचे फड संपत आल्याने येत्या आठ दिवसात साखर कारखान्यांचा पट्टा पडणार आहे. त्या ...
करमाळा : तालुक्यातील उसाचे फड संपत आल्याने येत्या आठ दिवसात साखर कारखान्यांचा पट्टा पडणार आहे. त्या दृष्टीने बाहेरगावाहून आलेला उसतोड मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी आवराआवर करू लागला आहे.
करमाळा तालुक्यात कमलाई, भैरवनाथ, आदिनाथ व मकाई हे चार साखर कारखाने आहेत. यंदा तीन साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतले. आदिनाथ सह. साखर कारखाना बंद राहिला. तालुक्यातील कमलाई शुगरने ४ लाख ३० हजार, भैरवनाथ शुगरने मकाई सह. साखर कारखान्याने १ लाख ३४ हजार उसाचे गाळप आजपर्यंत केले आहे. तालुक्याच्या शेजारी असलेल्या करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसर, सिना - कोळगाव धरण परिसर, मांगी तलाव या सिंचन क्षेत्रात शेतकरी ऊस पिकवतो. कारखान्याचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर वांगी, केत्तूर, कंदर, वाशिंबे, चिखलठाण, केडगाव, कुगाव, शेटफळ या भागात बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, पाथर्डी या भागातून उसतोड टोळ्या हजारोंच्या संख्येने आलेल्या आहेत. ऊसतोड पट्ट्यात मोकळ्या जागेत जिथं पाण्याची सोय असेल, अशा ठिकाणी ऊसतोड मजूर पाल ठोकून बिऱ्हाडासह राहतात.
----
मोजकेच फड शिल्लक
करमाळा तालुक्यात यंदाच्या गाळप हंगामासाठी २० लाख मेट्रिक टन उभा ऊस होता. कारखान्याचे हंगाम यंदा उशिरापर्यंत सुरू राहतील, असा अंदाज होता. अंबालिका, बारामती शुगर या कारखान्यांनी तालुक्यातील पश्चिम भागातील ६० टक्के ऊस गाळपासाठी नेला आहे. आता वाशिंबे, गोयेगाव, पारेवाडी, हिंगणी, राजुरी या मोजक्याच ठिकाणी उसाचे फड शिल्लक आहेत. फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या सप्ताहात शिल्लक ऊस संपेल, असा अंदाज आहे.
---
यंदा गाळपासाठी उसाचे क्षेत्र जादा असल्याने गाळप हंगाम लांबतील, असा अंदाज होता. पण, वेळेअगोदरच साखर कारखान्यांनी ऊसतोड केल्याने अपेक्षित वेळेपूर्वीच उसाचे क्षेत्र संपले आहे. ऊस तोडणीसाठी घेतलेली अॅडव्हान्स रक्कम परतफेड होऊ शकलेली नाही. पुढच्या वर्षी दुप्पट ३५ ते ४० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आहे. आता कारखान्याचा पट्टा पडताच आम्ही गावाकडे निघणार आहोत.
- भानुदास ढास, ऊसतोड मजूर, सावरगाव
--- २५करमाळा-शुगर१,२
फोटो: केत्तूर शिवारात शिल्लक उसाची तोडणी करताना मजूर. दुसऱ्या छायाचित्रात भिवरवाडी - ढोकरी शिवारात ऊसतोड मजुरांची पालं.
----