सोलापूरात एक लाख २३ हजार लाभार्थ्यांना दिला लाभ
By संताजी शिंदे | Published: June 16, 2023 06:01 PM2023-06-16T18:01:26+5:302023-06-16T18:01:51+5:30
शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे.
सोलापूर : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकानिहाय महाशिबिरातून, आजतागायत एक लाख २३ हजार २१२ लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात दि.१५ एप्रिल ते दि. ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहेत. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हाप्रमुख असून सोलापूर जिल्ह्यात अभियानादरम्यान १.५ लाख लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अभियान नियोजनाचा व अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनामार्फत दररोज आढावा घेण्यात येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने महसूल विभागांतर्गत फेरफार नोंदी निर्गती, विविध प्रकारचे दाखले वाटप, पी. एम. किसान योजना असे एकूण ६० हजार लाभार्थी, जिल्हा परिषदेमार्फत २० हजार, कृषि विभागामार्फत ८ हजार व नगरविकास, बांधकाम, आरोग्य, परिवहन व इतर विभागामार्फत ६५ हजार लाभार्थींना एकाच छताखाली लाभ देण्याकरीता महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांना किचकट प्रक्रियेतून दिलासा
नागरिकांना विविध सामाजिक, आर्थिक आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विविध कार्यालयात जाऊन जमवाजमव करणे, जमा केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयात जाणे अशा किचकट प्रक्रियेस सामोरे जावे लागते.
नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करून देणारी शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने लोकांचा बराचसा वेळ व पैसा खर्च होतो. काही वेळा लोकांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. अभियानामुळे एकाच छताखाली नागरीकांना अल्प कालावधीत उपलब्ध होत आहे.