मतमोजणी केंद्रात चोख बंदोबस्त

By admin | Published: May 17, 2014 01:15 AM2014-05-17T01:15:50+5:302014-05-17T01:15:50+5:30

रामवाडी गोदामात जाण्यासाठी रांगा लावल्या होत्या़ प्रत्येक कर्मचार्‍याची कसून तपासणी केली जात होती़

Better settlement at counting center | मतमोजणी केंद्रात चोख बंदोबस्त

मतमोजणी केंद्रात चोख बंदोबस्त

Next

 

सोलापूर : रामवाडी येथील शासकीय गोडाऊनमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ गोडावूनच्या आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता़ सकाळी साडेपाच वाजल्यापासून मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांनी रामवाडी गोदामात जाण्यासाठी रांगा लावल्या होत्या़ प्रत्येक कर्मचार्‍याची कसून तपासणी केली जात होती़ त्यामुळे मतमोजणीसाठी थोडा कालावधी उरलेला असतानाही कर्मचार्‍यांच्या रांगा लागल्या होत्या़ जिल्हाधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी पोलिसांना वेगाने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या़ रांगाही वाढविण्यात आल्या़ कर्मचार्‍यांना नियुक्तीपत्र सक्तीचे करण्यात आले होते़ काही कर्मचार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली नव्हती त्यांना तोंडी सूचना दिल्या होत्या़ त्यामुळे अशा कर्मचार्‍यांना पोलिसांनी रांगेतून बाहेर काढले़ खातरजमा केल्यानंतरच त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात आला़ सकाळी साडेसहा वाजता उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी यांची प्रवेशासाठी एकच धांदल उडालेली होती़ वेळ कमी असल्याने पोलिसांकडून होणार्‍या काटेकोर तपासणीला प्रतिनिधींनी विरोध केला़ मतमोजणी केंद्रात मोबाईल बंदी असल्याने प्रवेशद्वारावर मोबाईलधारकांची मोठी अडचण झाली होती़ मोबाईल, विडी, सिगारेट, तंबाखू नेण्यास बंदी असल्याने काही प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्राबाहेर थांबणे पसंत केले़ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची तर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी ७ वाजता सुरु झाली़ सुरुवातीला पक्षाच्या प्रतिनिधीसमोर इव्हीएम मशीनच्या स्ट्राँगरुमचे सील काढण्यात आले़ त्यानंतर इव्हीएम मशिनी मतमोजणी केंद्रात आणल्या गेल्या़ प्रारंभी दोनही मतदारसंघांतील पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली़ त्यानंतर मशीनच्या मोजणीस सुरुवात झाली़ विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलांवर मतमोजणी व्यवस्था करण्यात आली होती़ एका पाठोपाठ एक याप्रमाणे मतमोजणीचे निकाल लाऊड स्पिकरवरुन जाहीर केले जात होते़ पहिला निकाल सकाळी ८़४० वाजता जाहीर करण्यात आला़ निवडणुकीचा कल भाजपाच्या बाजूने असल्याचे लक्षात येताच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते केंद्रातून काढता पाय घेत होते़ याचवेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्राकडे रीघ लागली होती़ सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा स्पष्ट कल भाजपाच्या बाजूने असल्याची खात्री झाल्यानंतर उमेदवार शरद बनसोडे यांचे आगमन झाले़ युतीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच त्यांचे जंगी स्वागत केले़

Web Title: Better settlement at counting center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.