उन्हाळ्यात सापांपासून सावध रहा ; विष होतंय पातळ, मृत्यूचीही भीती
By विलास जळकोटकर | Published: March 15, 2023 06:18 PM2023-03-15T18:18:15+5:302023-03-15T18:18:25+5:30
उन्हाळा आल्यामुळे जसा मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, तसेच वन्यजीव प्राण्यांना तोंड द्यावे लागते.
सोलापूर : उन्हाळा आल्यामुळे जसा मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, तसेच वन्यजीव प्राण्यांना तोंड द्यावे लागते. या काळात अन्य ऋतूंपेक्षा विषारी सापांचे विष पातळ होत असल्याने नकळत कोणाचा हात किंवा पाय पडला तर तो कडकडून चावा घेतो आणि हे विष लवकर शरीरात पसरून रुग्णावर मृत्यू ओढावण्याची भीती असू शकते. यासाठी सावधानता बाळगावी, असा सल्ला सर्प अभ्यासकांनी दिला आहे.
बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान शेळगी परिसरात सहा फूट लांबीचा धामण जातीचा साप आढळला. यावेळी त्याला सुरक्षितरित्या पकडून निर्जनस्थळी सोडण्यात आले.
यावेळी सर्प अभ्यासक राहूल शिंदे यांनी उन्हाळ्यात पाण्याच्या निमित्ताने साप बाहेर पडतात. अशावेळी चुकून त्याच्या शरीरावर पाय पडल्यास ते या काळात चिडखोर होत असल्याने सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला. अन्य ऋतूपेक्षा या काळात विषारी साप चावणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.