खबरदार; क्वारंटाईन लोक बाहेर पडल्यास थेट तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:10 PM2020-05-29T12:10:24+5:302020-05-29T15:51:16+5:30
पोलीस अधिक्षकांचा इशारा; जिल्ह्यातून ४३ हजार लोक बाहेर गेले, ४१ हजार दाखल झाले
सोलापूर : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेले बाहेरील ४३ हजार नागरिक जिल्ह्यातून बाहेर गेले आहेत. तर आजतागायत सुमारे ४१ हजार लोक जिल्ह्यात आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनी घरातून व सध्या असलेल्या ठिकाणाहून बाहेर पडू नये, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये घातले जाईल, असा इशारा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिला.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, बाहेरून आलेल्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील १० ते १२ दिवसांत प्रत्येकाने काळजी घ्यावी. ज्यांना इन्स्टिट्यूशनल व होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांनी नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. अडीच हजार पोलीस कर्मचाºयांसमवेत अडीच हजार कोविड वॉरियर्स व दोन हजार ६० ग्रामसुरक्षा दल तैनात केले आहेत. पंढरपूरसह अन्य ठिकाणी सील करण्यात आलेल्या भागाला दररोज पोलीस अधिकारी भेटी देत आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने दि. १४ मार्च ते २७ मेदरम्यान अफवा पसरविल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ७ तर बेकायदा जिल्हा प्रवेश करणाºया ५८५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनाकारण रस्त्यावरून फिरताना आढळून आल्याने नऊ हजार ६२२ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. १२९ चारचाकी वाहने जप्त केली आहेत. चार ठिकाणी आंतरराज्य नाकाबंदी केली आहे. १७ ठिकाणी आंतरजिल्हा नाकाबंदी केली आहे. जिल्ह्यांतर्गत नाकाबंदी १६ ठिकणी केली आहे, असेही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.
१५२ कर्मचाºयांना घरी राहण्याचा सल्ला
- कोविड-१९ च्या संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून कर्मचारी व अधिकाºयांची वेळोवेळी काळजी घेत आहोत. थर्मल स्कॅनर व फिंगर ट्रिप प्लस साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. रोजच्या रोज आजाराची माहिती घेतली जात आहे. ५० ते ५५ वयापर्यंतच्या अधिकारी व कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे त्यांना गोळ्यांचे वाटप केले जात आहे. ५५ वर्षांच्या पुढील १५२ कर्मचारी व अधिकारी यांना ड्यूटीमधून सूट दिली आहे. त्यांना घरी बसण्याचा सल्ला दिला असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
सर्व कर्मचारी स्वस्थ..
- ग्रामीण पोलीस दलात एक अधिकारी व १२ कर्मचारी अशा एकूण १३ पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील बार्शी व वळसंग येथील दोन पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला. ११ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी सध्या पूर्णपणे बरे झाले असून, ते ड्यूटीवर आले आहेत.