‘भाग्यवंता घरी भजन-पूजन’ पिराची कुरोली, भंडीशेगाव पालखी तळावर तुकोबा माऊलीचा गजर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:58+5:302021-07-18T04:16:58+5:30
आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व देहूहून प्रस्थान करणारी संत तुकाराम महाराज पालख्यांचा पालखी मार्गावरील अनेक गावांमध्ये मुकाम असतो. ...
आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व देहूहून प्रस्थान करणारी संत तुकाराम महाराज पालख्यांचा पालखी मार्गावरील अनेक गावांमध्ये मुकाम असतो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याचं ‘भाग्यवंता घरी भजन-पूजन’ या अभंगातील ओवीप्रमाणे गावांमध्ये प्रत्येकवर्षी जोरदारपणे स्वागत करण्यात येते. पालखी मार्गावर पालखी मुक्काचा मान असलेल्या गावांना भाग्यवान समजले जाते. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीत शेकडो वर्षाची पायी वारीची ही परंपरा गर्दीमुळे आणखी संसर्ग होऊ नये, म्हणून बंद करण्यात आली आहे.
प्रत्येक वर्षीच्या वारी परंपरेनुसार शनिवारी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली तेथे संत तुकाराम महाराज व भंडीशेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा तालुक्यातील पहिला मुक्काम असतो. पालखी सोहळे प्रत्यक्षात येणार नाहीत, हे माहीत असतानाही या दोन्ही पालखी तळावर शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पालखी चौथऱ्यांवर ठेवून विधिवत पूजन करण्यात आले व ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करण्यात आला. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत गावातील प्रमुख मंडळींनी रात्री उशिरापर्यंत पालखी तळावर भजन, कीर्तन केले.
यावेळी पिराची कुरोलीचे सरपंच नशीर शेख, उपसरपंच रणजीत लामकाने, परमेश्वर लामकाने, तुकाराम कौलगे, कुलदीप कौलगे, नवनाथ शिंदे, गहिनाथ शिंदे, माउली कौलगे, तुकाराम कौलगे, दता सावंत, भाऊ कौलगे, तुकाराम माने, बाळासाहेब नाईकनवरे, सुभाष कौलगे आदी उपस्थित होते.
-----
पुढच्या वर्षी तरी पायी वारी पूर्ववत सुरू व्हावी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून पायी वारीची शेकडो वर्षाची परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे यात्रा कालावधीत लाखो वारकऱ्यांनी गजबजलेले पालखी तळ व पालखी मार्गावर सध्या शुकशुकाट आहे. यामुळे व्यावसायिक व स्थानिकांच्या आर्थिक उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पिराची कुरोली, भंडीशेगावकरांनी किमान पुढच्या वर्षी तरी खंडित झालेली पायी वारीची परंपरा सुरू व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली.
----१७पालखीतळ०१,०२
पिराची कुरोली तुकाराम महाराज पालखी तळावर तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भजन, कीर्तन करण्यात आले. यावेळी नशिर शेख, रणजित लामकाने, परमेश्वर लामकाने, तुकाराम कौलगे आदी.