भक्तवत्सल परमपूज्य चन्नवीर महास्वामीजी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:37 AM2020-02-06T10:37:01+5:302020-02-06T10:44:01+5:30

लिं. ष. ब्र. परमपूज्य वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्यांचा आज पुण्यस्मरण दिवस!

Bhaktavatsal Supreme Lord Channavir Mahaswamiji ...! | भक्तवत्सल परमपूज्य चन्नवीर महास्वामीजी...!

भक्तवत्सल परमपूज्य चन्नवीर महास्वामीजी...!

googlenewsNext
ठळक मुद्देलहानपणापासून चन्नवीर स्वामीजी कुशाग्रबुद्धीचे होते.वयाच्या १५ व्या वर्षापासून चन्नवीर स्वामींनी अनुष्ठान सुरू केलेचन्नवीर स्वामींच्या आचार-विचारात पावित्र्य होते

लिं. ष. ब्र. परमपूज्य वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्यांचा आज पुण्यस्मरण दिवस! इ. स. १९२५ ते १९५६ पर्यंत ते होटगी मठाचे मठाधिपती होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते मठाच्या कार्याला बांधील राहिले. त्यांच्या पवित्र भक्तांच्याप्रती त्यांच्या मनात असलेल्या वात्सल्यामुळे त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्यामुळे बृहन्मठ होटगी मठाच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले.

लहानपणापासून चन्नवीर स्वामीजी कुशाग्रबुद्धीचे होते. तेवढेच तेजस्वी रुप त्यांना लाभले होते. डोक्यावर जा, सडसडीत शरीरयष्टी, आरक्त गौर वर्ण, लांबूनही स्पष्ट दिसणारे त्यांच्या कपाळावरील भस्म, अंगावर भगवी सुती वस्त्रे, गळ्यात शिवलिंग, जोडीला एक पदरी रुद्राक्षाची माळ, पायात खडावा, हातामध्ये ‘श्री सिद्धान्त शिखामणी ग्रंथ’ त्यांचे नेत्र अभय देणारे होते. त्यांच्या वाणीत माधुर्य आणि जिव्हाळा होता. अतिशय प्रभावी, ओजस्वी वाणी! त्यामुळेच बिकट परिस्थितीत त्यांचा उपदेश लोकांच्या मनात रुजला आणि वाढला.
त्यावेळी मौजे होटगी गाव आणि परिसरातील पंचक्रोशीत सामाजिक परिस्थिती अतिशय बिकट होती. जमीनदाराकडे सहकुटुंब मोलमजुरी करून टाकलेला तुकडा लाचारीने खाण्यापलीकडे सर्वसामान्य लोकांचे दुसरे जीवनच नव्हते. जिथे पोटापाण्याचा प्रश्न सुटत नव्हता, तिथे शिक्षणाचे नाव घेणेसुद्धा कोसोदूर होते. ग्रामीण जनतेची ही दशा चन्नवीर स्वामींना बघवेना. बृहन्मठात केवळ धार्मिक कार्यात गुंतणे त्यांना जमेना. ते मठाच्या बाहेर पडले. होटगी गावात, आजूबाजूच्या खेड्यात पायी चालत लोकांकडे जाऊन त्यांची विचारपूस करू लागले.

चन्नवीर स्वामींच्या आचार-विचारात पावित्र्य होते. स्वामींनी शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यामुळे चन्नवीर स्वामीजींच्यावर ज्यांची भक्ती होती, ती वाढली आणि अतूट राहिली. नवीन भक्तांची संख्या वाढू लागली. गावात होत असणाºया पशुहत्येला ते विरोध करू लागले. अंधश्रद्धेने निष्पाप जनावरांना बळी देणे किती चुकीचे आहे,  हे त्यांनी लोकांना पटवून सांगितले. स्वामींनी सांगितलेला धर्म आपण सहज पाळू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. आपल्या मुलांना शिक्षण दिले तर ते स्वावलंबी होतील. आपल्यासारखे लाचारी जीवन त्यांच्या वाटेला येणार नाही, हे लोकांना कळून चुकले.

चन्नवीर स्वामी थोर साहित्यिक होते. त्यांनी अनेक भक्तीगीते आणि १७ नाटके स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली आहेत. समाज प्रबोधन हेच या नाटकाचं आणि भक्तीगीताचं सार आहे हे आजही आपल्याला जाणवतंय. आजही त्यांची भक्तीगीते श्रवणीय आहेत. आजही ग्रामीण भागात जत्रेच्या वेळी त्यांनी लिहिलेली नाटके आपल्याला जीवनातील सत्यता आणि वास्तवता सांगतात.
शिक्षणाचा आणि धर्माचा प्रसार करीत चन्नवीर महास्वामीजी सोलापुरात आले. त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी उत्तर कसब्यामध्ये १९३९ मध्ये मोठे मठ बांधून दिले. स्वामीजींनी येथे ‘श्री मद्वीरशैव गुरुकुल’ नावाची संस्कृत पाठशाळा सुरू केली. त्यामुळे ग्रामीण भागातील व सोलापुरातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांची सोय झाली. या मठात शिक्षण घेऊन अनेक बटू तयार होऊन आपला जीवन व्यवसाय सुरू केला. काही बटू मठाधीश झाले तर काही पंचपीठाचे जगद्गुरू झाले. स्वामीजींनी सोलापुरातील भवानी पेठेत ‘सिद्धलिंगाश्रम’ वसतिगृह सुरू केले. सर्वधर्मीय गरीब विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला. येथील अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत राहून निवृत्त झाले. चन्नवीर महास्वामी दूरदृष्टीचे होते. १९४३ साली त्यांनी एम. आय. डी. सी. जवळची जागा विकत घेतली. आज त्याच जागेत भव्य शैक्षणिक संकुल आणि प्रेक्षणीय मंदिर उभे आहे.

वयाच्या १५ व्या वर्षापासून चन्नवीर स्वामींनी अनुष्ठान सुरू केले. त्यांचे अनुष्ठान कठीण व खडतर होते. त्यामुळेच त्यांना ‘बालतपस्वी’ व ‘वीरतपस्वी’ अशी पदवी बहाल करण्यात आली. त्यांचे सर्व तपोनुष्ठान भक्तांच्या कल्याणार्थ होते. त्यांनी केलेले कार्य सर्वांना संस्मरणीय आहे, अनुकरणीय आहे. त्यांच्या ‘आत्मज्योतीस’ प्रणाम!
- चंद्रकला शीलवंत

Web Title: Bhaktavatsal Supreme Lord Channavir Mahaswamiji ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.