भाळवणी ग्रामपंचायतीत अपहार
By admin | Published: May 13, 2014 02:08 AM2014-05-13T02:08:15+5:302014-05-13T02:08:15+5:30
९.५७ लाख रक्कम: तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल
उपरी : भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये सन २००२ साली बोगस कामे दाखवून तब्बल ९ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच लक्ष्मी यशवंत कुचेकर व ग्रामसेवक जे. पी. भांडे यांच्याविरुद्ध सोमवारी (१२ मे) पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे. १ फेबु्रवारी २००२ ते ३१ जुलै २००२ या कालावधीत सरपंच लक्ष्मी कुचेकर व ग्रामसेवक जे. पी. भांडे यांनी संगनमताने प्रमाणकाशिवाय ८६५७८ टी.सी.एल. पावडरची बोगस खरेदीमध्ये २२२००, पाईपलाईन दुरुस्तीमध्ये ६७२७६, कर्मचारी वेतन बोगस खर्च १७३००, ग्रामपंचायतीच्या वसुलीपेक्षा कमी भरणा ६३७९, शिलकेनुसार कमी भरणा १८०८, निनावी जमा व खर्च दाखवून ६४९७४, दरपत्रकाशिवाय नियमबाह्य खरेदीत २,३४,८०२, बोगस साहित्याचा खर्च २,९३,८३० बांधकाम न करता खर्च दाखवून १,३४,७८०, मूल्यांकनाशिवाय १,४६,२६६, वीज बिल दंड ६३८, ठेवी नियमबाह्य ८४०००, ग्रामनिधीची रक्कम जमा न करता परस्पर खर्च ५४,८००, मोघम खर्च १ लाख ८ हजार २४ असा एकूण ९ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा अपहार केला. याबाबत तत्कालीन विस्तार अधिकारी पी. एम. शिंदे यांनी चौकशी करून कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी सुनावणी घेत संबंधितांनी अपहाराची रक्कम तत्काळ न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकार्यांना दिले होते. याबाबत पंढरपूरचे गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना अपहाराची रक्कम भरण्याविषयी वेळोवेळी लेखी पत्र दिले. मात्र सरपंच लक्ष्मी कुचेकर, ग्रामसेवक जे. पी. भांडे यांनी रक्कम न भरल्यामुळे गुन्हा नोंदला आहे. तपास कल्याण ढवणे करीत आहेत.
------------------------------------------
अशिक्षित सरपंचांचा घेतला फायदा ४महिला आरक्षणामुळे लक्ष्मी कुचेकर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. मात्र त्या अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत ग्रामसेवक भांडे याने ९ लाख ५७ हजारांचा अपहार केला आहे. सध्या सरपंच या मोलमजुरी करीत असल्याने अपहाराची रक्कम कशी भरायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------------------------------------
भाळवणीपाठोपाठ उपळाई, टेंभुर्णीतही अपहार
भाळवणी ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या सहा महिन्यात ग्रामसेवकाने ९ लाख ५७ हजारांचा अपहार केला. यानंतर बदली झाल्यावर माढा तालुक्यातील उपळाई ग्रामपंचायतीमध्ये अंदाजे ११ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मागील महिन्यात गुन्हा नोंदला आहे. तर टेंभुर्णी ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या अपहाराची चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.