"भंडारा टाकणे ही तर स्टंटबाजी, तुम्हाला किंमत मोजावी लागेल", विखे-पाटलांच्या भंडारा प्रकरणावर भाजप अन् काँग्रेसचे शहराध्यक्ष भिडले
By राकेश कदम | Published: September 8, 2023 12:13 PM2023-09-08T12:13:06+5:302023-09-08T12:13:52+5:30
भंडार टाकणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीची भाजप नेत्यांना किंमत मोजावी लागेल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले.
सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी भंडारा टाकला. हा प्रकार म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली. दरम्यान, भंडार टाकणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीची भाजप नेत्यांना किंमत मोजावी लागेल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर शासकीय विश्रामगृहात भंडारा टाकण्यात आला. यावर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, भाजप सरकार धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी कटिबध्द आहे. धनगर समाजाच्या ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. विखे-पाटील यांच्यावर भंडारा टाकणारे लोक स्टंटबाजी करणारे आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी हा स्टंट केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रक काढले. नरोटे म्हणाले, धनगर समाज बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर लढा देत आहेत. त्यांची मागणी न्याय आहे. आमची सत्ता आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढला जाईल, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. या आश्वासनाचा आता त्यांना विसर पडला आहे. धनगर समाजातील कार्यकर्त्यांवर हात उगारण्याचा प्रकार समाज बांधव खपवून घेणार नाहीत. भाजप नेत्यांना याची किंमत मोजावी लागेल.