सांगोल्याशी भय्यू महाराजांचा ऋणानुबंध, दुष्काळात दिला होता मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:47 PM2018-06-13T12:47:16+5:302018-06-13T12:47:16+5:30
मधुमतींना भेटण्यासाठी भय्यू महाराज सांगोल्यात येत असत. बालपणातील काही दिवस भय्यू महाराजांनी सांगोल्यात घालवले.
सोलापूर : राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या थोरल्या भगिनी मधुमती या येथील डॉ. प्रदीप साळुंखे-पाटील यांच्या पत्नी. मधुमतींना भेटण्यासाठी भय्यू महाराज सांगोल्यात येत असत. बालपणातील काही दिवस भय्यू महाराजांनी सांगोल्यात घालवले. त्यामुळे त्यांचा आणि सांगोल्याचा एक ऋणानुबंध होता, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रदीप साळुंखे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे प्रदीप हे बंधू आहेत. त्यामुळे भय्यू महाराजांचा दीपकआबांशीही तितकाच स्नेह होता. जेव्हा मधुमतींचा विवाह झाला, त्यावेळी भय्यू महाराज १० वर्षांचे होते. त्यांनी सांगोल्यात घालवलेल्या बालपणातील आठवणींना साळुंखे-पाटील कुटुंबीयांनी उजाळा दिला.
नुकतेच भय्यू महाराजांनी साळुंखे-पाटील कुटुंबीयांकडे गरजूंसाठी कपडे पाठवून दिले होते. वेळ मिळाला तर मी नक्कीच येईन, असा शब्दही त्यांनी दिला होता. आता ते कधीच सांगोल्यात येऊ शकणार नाहीत, ही आमच्यासाठी खंत असल्याची भावना डॉ. प्रदीप साळुंखे-पाटील आणि त्यांच्या स्नुषा डॉ. नेहा साळुंंखे पाटील यांनी व्यक्त केली.
विश्रांतीसाठी १५ दिवस होते सांगोल्यात
- डॉ. नेहा साळुंखे-पाटील म्हणाल्या की, माझे आई-वडील भय्यू महाराजांचे शिष्य असल्यामुळे माझ्या लग्नाचा योग त्यांनीच जुळवून आणला. म्हणून प्रदीप साळुंखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. पियुष साळुंखे-पाटील यांच्याशी माझा विवाह झाला. दोन्ही मुलांची नावेदेखील त्यांनीच ठेवली होती. साळुंखे-पाटील व माझ्या माहेरच्या घरातील प्रत्येक निर्णय त्यांना विचारल्याशिवाय होत नव्हता, असे सांगून सन २०१४ साली अपघातानंतर भय्यू महाराज सांगोल्यात आरामासाठी पंधरा दिवस होते, याची आठवणही त्यांनी करुन दिली.
घटनेनंतरचा पहिला फोन सांगोल्यात
- भय्यू महाराज यांचे शिवणे येथे केंद्रीय निवासी आश्रमशाळा असून, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांनी वाढेगाव येथील हायस्कूल व ज्यु.कॉलेजला भय्यू महाराजांचे नाव दिले आहे. मंगळवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घटना घडताच भय्यू महाराज यांच्या निवासस्थानातून पहिला फोन भगिनी मधुमती साळुंखे-पाटील यांना आला. त्यावेळी मेहुणे डॉ. प्रदीप साळुंखे-पाटील यांनी तुम्ही त्यांना तत्काळ हॉस्पिटलला घेऊन जा आम्ही तातडीने येतो, असे सांगून साळुंखे-पाटील कुटुंबीय इंदौरकडे रवाना झाले.
दुष्काळात दिला मदतीचा हात
- २०१३ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. सांगोल्यात त्याची तीव्रता अधिक होती. जनावरांच्या चारा उभारल्या होत्या. ही गोष्ट भय्यू महाराजांना कळली, तेव्हा त्यांनी तातडीने जनावरांना चारा उपलब्ध करुन दिला. शिवाय पाण्याचा टाक्याही देऊन आपली मुक्या प्राण्यांविषयी आपले प्रेम व्यक्त केले होते.