पर्यावरणप्रेमी भातवाले मामांनी जिल्हा परिषद शाळेत फुलवली वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:58 AM2020-05-16T11:58:04+5:302020-05-16T12:03:17+5:30
मोडनिंब येथील मुलींची शाळा; पोषण आहार देणाºया युवकाची कमाल
मोडनिंब : मे महिना सुरू... उन्हाची तीव्रता वाढलेली...शाळांना सुट्टी़...त्यामुळे शाळेकडे कोणी फिरकतही नाही़ त्यामुळे शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांनी प्रांगणात लावलेली झाडे उन्हाळ्यात करपून जातात़ पण मोडनिंब झेडपी शाळेतील शालेय पोषण आहार पुरवणाºया विजय परबत (भातवाले मामा) या तरुणाने रोज शाळेत येऊन परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या सर्व झाडांना पाणी देऊन शाळेत वनराई फुलवली.
मोडनिंब येथील झेडपी मुलींच्या शाळेच्या पटांगणात तीन वर्षांपूर्वी विशाल मेहता यांनी लहान रोपे दिली होती, ती आता मोठी झाली आहेत़ त्यांना उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता होती़ ते काम विजय परबत हे दररोज करतात.
प्रत्येक शाळेमध्ये वर्षभरात विविध कार्यक्रमांदरम्यान वृक्षारोपण होते़ पण उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर ती झाडे शाळेच्या आवारात दिसतीलच असे नाही़ मात्र मोडनिंब येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये मुलींना भात वाटप करणारे व शालेय पोषण आहार पुरवणाºया विजय परबत या युवकाने ना कोणाकडून मानधन घेतले, ना कोणता भत्ता शिवाय हे कर म्हणूनही त्याला कोणी सांगितलेले नाही़ तरीही गेल्या दोन महिन्यांपासून तो रोज शाळेत येऊन झाडांना पाणी देण्याचे काम करीत आहे.
झाडे हिरवी झाल्याचा मनस्वी आनंद
- विजय परबत या युवकाला शाळेतील सर्व विद्यार्थिनी भातवाले मामा या नावाने ओळखतात़ शाळेची मधली सुट्टी झाली रे झाली, मुलींना रोज गरमागरम शालेय पोषण आहार देतो़ एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांमुळे आपल्याला चार पैसे मानधन म्हणून मिळतात, तेथील शाळेचा परिसर स्वच्छ व हरित दिसला पाहिजे, अशी मनाशी खूणगाठ बांधून शाळेसमोर लावलेली चिंच, वड, पिंपळ, करंजा, सप्तपर्णी यांसह अन्य सर्व झाडांना दररोज शाळेचे गेट उघडून दोन ते तीन तास पाणी देतो़ त्यामुळे उन्हाळ्यातही ही झाडे हिरवीगार दिसत आहेत़ त्याचा मनस्वी आनंद आहे, असे विजय परबत या युवकाने सांगितले़