महामानवाला अभिवादन करत सोलापूर शहरातून 'भीम जयंती उत्सव' मिरवणुकीला प्रारंभ
By संताजी शिंदे | Published: April 23, 2023 07:19 PM2023-04-23T19:19:59+5:302023-04-23T19:20:31+5:30
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११.३० वाजता उत्साह व जल्लोषात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही ...
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११.३० वाजता उत्साह व जल्लोषात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सुमारे १२५ हून अधिक विविध मंडळांनी या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास सोलापूर शहरात दिनांक १४ एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला. या जयंती सप्ताहाची सांगता रविवार २३ एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीने होत आहे. या भव्य दिव्य दिमाखदार अशा मिरवणुकीस आज सकाळी ११.३० वाजल्यापासूनच उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.
महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. महापालिकेच्या पहिल्या गाडीची पूजा करून या मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. "बोलो रे बोलो जय भीम बोलो", "ताकत से बोलो जय भीम बोलो", "हिम्मत से बोलो जय भीम बोलो" अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त सुभानजी बनसोडे, उत्सव अध्यक्ष शिवम सोनकांबळे, कार्याध्यक्ष वैशाली उबाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष सुहास सावंत हे प्रमूख मान्यवर उपस्थित होते.
रखरखत्या उन्हातही उत्साहाला उधाण आले आहे. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. एका पेक्षा एक सरस अश्या आकर्षक सजावटी व देखावे विविध मंडळांनी साकारले आहेत. डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहारी दृश्य या मिरवणुकांकडे पाहिल्यानंतर दिसून येते. बहुतांश मंडळांनी डॉल्बीसह भव्य अशा मिरवणुका काढल्या आहेत. डॉल्बीवर डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्यासह विविध प्रकारची गाणी वाजविण्यात येत आहेत.