भीमा व सीनेतील वाळू लिलाव बंद; सोलापुरातील बांधकामाला तापी नदीची वाळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:54 PM2020-12-26T12:54:45+5:302020-12-26T12:54:50+5:30
पर्याय निवडला : स्लॅब, गिलावा पक्का होण्यासाठी वापर सुरू
सोलापूर : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यावर सोलापुरात बांधकामे धुमधडाक्याने सुरू झाली आहेत. भीमा व सीनेतील वाळू लिलाव बंद असताना इतकी बांधकामे कशी सुरू आहेत, याचा शोध घेतल्यावर सोलापुरात ६५० किलोमीटर प्रवास करून तापी नदीचीवाळू आणली जात आहे.
स्थानिक वाळूपेक्षा तेथील वाळू महाग असली तरी बांधकाम थांबायला नको, यासाठी सोलापूरकरांनी हा पर्याय निवडला आहे. दोन वर्षांपासून वाळूचे लिलाव बंद असल्याने जिल्ह्यात वाळूची टंचाई जाणवत आहेत. यामुळे बांधकामे थांबली होती. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सर्व कामे थांबली होती. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला गती आली. डस्टद्वारे वाळू टंचाईवर मात करीत बांधकामे सुरू झाली आहेत. डस्टच्या वापराने कॉलम, विटाचे बांधकाम, सिमेंट विटा तयार करण्याला गती आली आहे. मात्र स्लॅब व गिलावा पक्का होण्यासाठी चांगल्या प्रतीच्या वाळूचा आग्रह अभियंते करीत आहेत. त्यामुळे वाळूचा चोरटा उपसा होत असल्याचे चित्र दिसत होते. पण महसूल, पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केल्यावर वाळूचा शोध सुरू झाला.
अशी होते वाहतूक
सोलापुरातील कारखान्यात तयार झालेले सिमेंट नाशिकला मोठ्या प्रमाणावर नेले जाते. सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनी येताना रिकामे येण्याऐवजी सुमारे सव्वाशे किलोमीटर प्रवास करून नंदुरबार जिल्ह्यातील तापी खोऱ्यातील वाळू आणण्यास सुरुवात केली. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चौकाचौकांत एजंट निर्माण झाले आहेत. दररोज २० ट्रक वाळू सोलापुरात येत आहे.
वाळू वाहतुकीला परवानगी
तापी खोऱ्यात चौदाचाकी ट्रकमध्ये १२ हजारांना वाळू भरून दिली जाते. ही वाळू देशभर वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यामुळे आरटीओ, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस यांचा त्रास होत नाही. सोलापुरात ब्रासला सात हजार दर शासन घेते. परंतु तापी नदीत १२ हजारांना साडेसहा ब्रास वाळू भरून दिली जाते. सोलापूरला वाळू पोहोचण्यासाठी २८ हजारांचे डिझेल लागते. त्याचबरोबर सिमेंट वाहतुकीचे भाडे मिळते, असे ट्रकचालक आरवत यांनी सांगितले.