भीमा कारखान्याचा वजनकाटा अचूक; वैधमापन विभागाचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:21 AM2021-02-13T04:21:57+5:302021-02-13T04:21:57+5:30
भीमा साखर कारखान्याच्या वजनकाट्याची वैधमापन विभागाने तपासणी केली. यामध्ये याच विभागाने पूर्वी केलेले सील जसेच्या तसे शाबूत होते. यावेळी ...
भीमा साखर कारखान्याच्या वजनकाट्याची वैधमापन विभागाने तपासणी केली. यामध्ये याच विभागाने पूर्वी केलेले सील जसेच्या तसे शाबूत होते. यावेळी सोलापूर वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक पी. एच. मगर यांनी काट्यावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर तसेच बैलगाडी यांचे प्रत्यक्ष वजन घेतले. त्यावेळी वजनकाटे तंतोतंत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार नसल्याचा अहवाल निरीक्षक मगर यांनी दिला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी सांगितले की, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरळीतपणे चांगला चालू असून ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार,वाहन मालक व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. आजअखेर २ लाख १० हजार मेट्रिक टन गाळप झाले आहे. १ लाख ९० हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.३५ टक्के मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिटन दोन हजार रुपये प्रमाणे पहिली उचल जमा करून शेतकऱ्यांना योग्य दर दिला असल्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप व कार्यकारी संचालक एस जे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक एस जे शिंदे, चिफ इंजिनिअर परमेश्वर आसबे, शेती अधिकारी एम. ए. पाटील, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते.
----