सोलापुरातील भिमाई वस्ती ; मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात मिलिंद नगरातून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:57 AM2018-12-01T10:57:11+5:302018-12-01T10:59:05+5:30
थोरला राजवाडा : बाबासाहेबांनी फुंकले चळवळीचे रणशिंग
संताजी शिंदे ।
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून सर्वप्रथम बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील थोरला राजवाड्यातून झाली. बाबासाहेबांच्या तत्कालीन चाहत्यांनी महार वतनदार परिषद आघाडीचे रामचंद्र सरवदे व त्यांच्या सहकाºयांनी नगराध्यक्षाला सोबत घेऊन चळवळीचे रणशिंग फुंकले.
आंबेडकरी चळवळीच्या एकंदरीत जडणघडणीत अशिक्षित लोकांना आपल्या बोली भाषेत साहित्य, नाटक व जलशातून परिवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळचे अंध कवी साहित्यिक एन.टी. बनसोडे यांनी मोलाची कामगिरी केली. नगरपालिकेचे तत्कालीन पहिले नगरसेवक मोहनदास बाबरे हे होते. जसजशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची व्याप्ती वाढत गेली, त्याप्रमाणे दुसºया पिढीतील नेत्यांमध्ये आर.एस. रणशृंगारे, एल.एन. आबुटे, तुकाराम (बुवा) इंगळे, विष्णू बाबरे, मल्हारी सोनकांबळे, भीमराव सरवदे आदी लोकांचा समावेश होता. या मंडळींनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील सामाजिक व राजकीय लढे लढले आहेत. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.
याच कालावधीत राजकीय क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी आली. त्यामध्ये बी.एस. तळभंडारे, एम.के. कांबळे, सुभानजी बनसोडे यांचा उदय झाला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला होता, यामध्ये राहीबाई निकंबे यांनी महिलांचे नेतृत्व केले होते.
कालांतराने दलित पँथरची चळवळ सुरू झाली, त्यात राजा तळभंडारे, विनायक बनसोडे, बब्रुवान साळवे यांनी तीव्रता वाढवली. त्यानंतरची चळवळ अतिशय वेगवान करण्यासाठी राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, कुमार तळभंडारे, भीमराव बाबरे, राहुल सरवदे, यल्लेश्वर सरवदे, भारत सुतकर, सुनील आबुटे, सुबोध वाघमोडे, सुधाकर सरवदे, राम सरवदे, मोहन बनसोडे आदींनी पँथरचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही लोक आजही त्याच ताकदीने निळे निशाण घेऊन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत.
शहराकडे चला...
- डॉ. बाबासाहेबांनी शहराकडे चला असा नारा दिला होता, त्याला प्रतिसाद म्हणून शहरालगत असणाºया दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी भागातील लोक सोलापुरात वास्तव्याला आले होते. याच काळात बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे वास्तव्य झाले. अशाच पद्धतीने राजकारणाच्या काळात मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बसवकल्याण आदी भागातून लोक स्थलांतरीत झाले. लोकवस्ती वाढल्याने सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू होत गेले. आज या बुधवार पेठ, मिलिंद नगरला चळवळीची राजधानी म्हणून ओळखले जाते.