सोलापूरात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, स्मारक सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरेल : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:13 PM2017-11-18T13:13:16+5:302017-11-18T13:16:52+5:30
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक हे सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरेल
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक हे सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मार्कंडेय जलतरण लगत, पोलीस मुख्यालयासमोर उभारण्यात येणाºया शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख बोलत होते. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपमहापौर शशिकला बत्तुल, परिवहन समिती सभापती दैदिप्य वडापूरकर, स्थायी समिती सभापती संजय कोळी, शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, नगरसेविका सुनीता रोटे, नगरसेवक गणेश वानकर, सुनील कामाठी, विनायक कोंड्याल, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे, विष्णू कारमपुरी, पद्माताई म्हंता, शांताताई जाधव, श्रावण भंवर, राजू हौशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महाराष्ट्रात पहिल्यांदाच सोलापुरात होत आहे. हा प्रस्ताव मी काँग्रेसमध्ये असताना महापालिकेत पहिल्यांदा मांडला होता. सध्या भाजप आणि सेनेची केंद्रात आणि राज्यात युती आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सेनेचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून निधी उपलब्ध केला जाईल. या ठिकाणी वाचनालय, युपीएससी, एमपीएससीचे क्लासेस आदी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी मानले.
-------------------
मालक-अण्णांच्या भाषणातून युतीचे संकेत?
४स्मारकाच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना प्रथमत: विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनेची युती आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतही युती असती तर आज दोन्ही पक्षांचे ८५ नगरसेवक पालिकेत असते. दोन्ही पक्ष हिंदुत्व या एका विचाराने चालणार आहेत, त्यांना नेहमी फोडण्याचे काम करण्यात आले आहे. आता आपण एकमेकांना जोडण्याचं काम करू आणि शहराच्या विकासासाठी एकत्र येऊ असे मत व्यक्त केले.
४आपल्या भाषणात पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, तुम्ही आम्हाला विश्वासात घेतल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला लवकर सुरुवात झाली आहे. शहराच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला करू असे सांगत पालकमंत्र्यांनी महेश कोठे यांच्या भाषणाला उत्तर दिले.
------------------
सेनाप्रमुखांनी जात पाहिली नाही : शिवरत्न शेटे
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात गडावरील प्रस्थापितांच्या गड्यावाडे उद्ध्वस्त करण्याचे काम केले. त्याच पद्धतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या सत्ताधाºयांची मक्तेदारी नष्ट करीत महार, मांग, ढोर, चांभार, माळी, मराठा यांच्यासह मुस्लीम समाजातील सर्वसामान्य लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून आमदार, खासदार आणि मंत्री बनविले. शिवसेना चालवत असताना त्यांनी कधीही जात पाहिली नाही. मुंबईमध्ये मराठी माणसाला त्यांचा स्वाभीमान मिळवून दिला, असे प्रतिपादन शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.