संत नामदेव महाराष्ट्र भवनाचे घुमाण येथे २३ जुलैला भूमीपूजन, राज्यपालांची प्रमुख उपस्थिती; वारकऱ्यांना येण्याचे आवाहन
By शीतलकुमार कांबळे | Published: July 18, 2024 07:57 PM2024-07-18T19:57:20+5:302024-07-18T19:58:04+5:30
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
अकलूज : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे वास्तव्य असलेल्या श्रीक्षेत्र घुमाण (पंजाब जि. गुरुदासपूर) येथे श्री संत नामदेव महाराष्ट्र भवन या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, महाराष्ट्र राज्य व श्री नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) यांनी संत शिरोमणी श्री नामदेव महाराष्ट्र भवनसाठी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे वीस रुम व एक मोठे सभागृह बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यापैकी एक कोटीचा निधी पंजाब राज्यपाल कार्यालयाने मंजूर केला आहे. उर्वरीत एक कोटी महाराष्ट्र शासनाने द्यावा असे सुचविले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर दौऱ्यावर आले असता पत्रकार संघाच्यावतीने त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. तसेच शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनीही मुख्यमंत्र्याची भेट घेवुन निधी देण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भोसले यांनी सांगितले.