सोलापूर मनपा आयुक्तांचे मोठा निर्णय; आता ग्राहकाला मास्क नसल्यास व्यापाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:25 AM2021-03-05T11:25:26+5:302021-03-05T11:25:32+5:30
पाच हजारांचा दंड, दुकान सीलनंतर मोठी कारवाई
साेलापूर : दुकानामध्ये विनामास्क ग्राहक आढळून आला तर दुकानदाराला दाेन हजार रुपये आणि ग्राहकाला एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. हा प्रकार पुन्हा आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड करून दुकान सात दिवसांसाठी सील करण्यात येईल, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केले.
काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी आयुक्तांनी २४ फेब्रुवारी राेजी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शहरातील सर्व भाजी विक्रेते, मांस विक्रेते, आठवडा बाजार, माॅल्स, शाॅपिंग सेंटर, फेरीवाले यांना काही नियम व अटींचे पालन करण्याचे आदेश दिले हाेते. या आदेशात आयुक्तांनी गुरुवारी सुधारणा केली. पूर्वी विनामास्क ग्राहक आढळून आल्यास दुकानदाराला दाेन हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेश हाेते. दुसऱ्यांदा उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ३० दिवसांसाठी आस्थापना बंद करण्यात येईल, असेही नमूद केले हाेते.
आता विनामास्क ग्राहक आढळून आल्यास दुकानदाराला दाेन हजार रुपयांचा दंड हाेईल. शिवाय ग्राहकालाही एक हजार रुपयांचा दंड हाेणार आहे. दुसऱ्यांचा उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांचा दंड आणि सात दिवस दुकान सील करण्यात येईल. तिसऱ्यांचा उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करून दहा हजार रुपयांचा दंड आणि १५ दिवस दुकान सील करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त, मंडई अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित विभागातील पाेलिसांनी ही कारवाई करावी, असे आयुक्तांनी कळविले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठांमध्ये फिरून कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई आणखी कडक हाेण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
रुग्ण आढळल्यास इमारत सील हाेणार
तपासणीमध्ये एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्यास सदर ठिकाणचा भाग, बिल्डिंग सील करण्यात यावी. मायक्राे सिलिंग करण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात यावी. पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरणार नाही याची काळजी घ्यावी. व्यक्ती बाहेर फिरत असेल तर त्याला काेविड सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.
---