साफळेत सासरा विरुद्ध सुनेची होतेय बिग फाइट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:16 AM2021-01-10T04:16:43+5:302021-01-10T04:16:43+5:30
यंदा भाजपचे अशोक बंदीछोडे, विजय साखरे, मारुती निंगदाळी असे तीन सत्ताधारी बंदीछोडे गटाचे विद्यमान सदस्य फुटून विरोधी चंद्रकांत बंदीछोडे ...
यंदा भाजपचे अशोक बंदीछोडे, विजय साखरे, मारुती निंगदाळी असे तीन सत्ताधारी बंदीछोडे गटाचे विद्यमान सदस्य फुटून विरोधी चंद्रकांत बंदीछोडे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे सत्ताधारी ग्रामविकास पॅनलमध्ये चिंतेचे तर बजरंगबली विरोधी गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी गटाने कोणी कुठेही फुटून गेले तरी जनता जनार्दन काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, असे सांगितले.
या ग्रामपंचायतीवर गेल्या १५ वर्षांपासून राजकुमार बंदीछोडे व चंद्रकांत बंदीछोडे भाऊच एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहे. यंदा चौथ्यांदा बिग फाइट होत आहे. एकहाती सत्ता असलेल्या सत्ताधारी गटाचे तीन विद्यमान सदस्य फुटून विरोधी गटाकडून निवडणूक लढवत आहेत. यामुळे विरोधकांना बळ मिळाले आहे.
अशी आहे बिग फाइट
सासरे चंद्रकांत बंदीछोडे विरुद्ध विद्यमान सरपंच सून छाया बंदीछोडे यांची लढत लक्षवेधी ठरत आहे. शिवाय काका कलप्पा माळी गटाच्या विरोधात पुतणी शैला माळी निवडणूक लढवीत आहेत. या दोन्ही बिग फाइट होत असून गावात चर्चेचा विषय ठरत आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांनी ग्रामदैवत हनुमान मंदिर बांधकामाला कोणीही ८ लाख रुपये द्यावे. त्यांना बिनविरोध सरपंच करू, अशी अट ग्राम मेळाव्यात घातली होती. त्यास सत्ताधारी गटाकडून नकार आल्याचे विरोधी गटाचे चंद्रकांत बंदीछोडे यांनी सांगितले. त्यास उत्तर देताना राजकुमार बंदीछोडे यांनी प्रस्ताव ठेवणारे व नाकारणारे माझे पारंपरिक विरोधकच असल्याचे सांगितले.