छोट्या व्यापाºयांचे मोठे नुकसान...पण लोकांचा जीवही महत्त्वाचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 02:18 PM2020-05-21T14:18:35+5:302020-05-21T14:20:37+5:30
मुस्लीम व्यापाºयांच्या भावना; भुसार बाजारात नफेखोरी होत असल्याची टीका
सोलापूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. मीना बाजार, बेगम बाजारसह अनेक बाजार भरणार नाहीत. कपडे, ज्वेलरीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निरीक्षण व्यापाºयांनी नोंदविले आहे. दुसरीकडे काही व्यापाºयांनी मसाल्यासह इतर वस्तूंची साठेबाजी करुन नफा कमावल्याची टीकाही केली आहे.
सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संघटनेचे सदस्य जुबेर बागवान म्हणाले, रमजान ईद हा मुस्लिम समाजासाठी सर्वात मोठा सण असतो. गरिबातील गरीब ईदनिमित्त नवे कपडे, चपला, ज्वेलरीची खरेदी करतो. ईदच्या दिवशी शिरखुर्म्यासह विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी साहित्याची खरेदी करतो. दुधाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. टेलरकडे गर्दी असते. यासाठी व्यापारपेठा सजलेल्या असतात. एखाद्या छोट्याशा दुकानात कपडे, ज्वेलरीचे दुकान चालविणारा दुकानदार चार महिने आधीपासून याची तयारी करतो. अॅडव्हान्स देऊन ठेवलेले असते. वर्षातील २० ते २५ टक्के नफा रमजानच्या महिन्यात मिळतो. या सर्वांचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. पण हे नुकसान कधीही भरुन निघेल. आता लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने दुकाने बंद राहणे बरे आहे.
माल मुंबई, हैदराबादेत पडून
- सोलापूर ट्रेडर्सचे महंमद ख्वाजा नसरुद्दीन म्हणाले, यंदा पहिल्याच ईदमुळे संपूर्ण महिना घरी राहता आले. अल्लाहकडे दुवा करता आली. दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. या काळात अनेक लोकांनी चढ्या दराने मसाले, तेल, धान्याची विक्री केल्याचे आम्ही पाहिले आहे. ज्यांच्याकडे साठा करायला जागा असते त्यांनी आधीच साठा करुन ठेवला होता. मोठा नफा कमावला. फॅशन व इतर प्रकारच्या वस्तू विकणारा व्यापारी मात्र संकटात आला. दरवर्षी २० ते ३० ट्रक खजूर शहरात येतो. यंदा मात्र केवळ दोन ते तीन ट्रक आले असतील. माल मुंबई, हैदराबाद येथे पडून आहे. पण शहरात येऊ शकत नाही. रमजानच्या काळात अव्वल दर्जाचे काजू, बदाम व मसाले येतात. यंदा ते सुध्दा आले नाहीत.
आॅनलाईनला परवानगी मिळेल; पण...
- लिबास कलेक्शनचे जावेद दंडोती म्हणाले, मार्च, एप्रिल महिन्यात लग्नाचा सीझन गेला. आता रमजान सणही जातोय. आम्हाला आॅनलाईन विक्रीची परवानगी मिळू शकते. कपड्यांची दुकाने उघडली की लोक गर्दी करतील. पण आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. आज आमचं नुकसान झालंय. उद्या ते भरुन निघेल. पण बाजारात अनेक छोटे व्यावसायिक आहेत. त्यांचे नुकसान लवकर भरुन निघणार नाही याची खंत आहे.
दोन महिन्यांपूर्वी अॅडव्हान्स दिलाय
- होटगी रोड परिसरातील अस्लम शेख म्हणाले, गेली चार-पाच वर्षे मी ईदनिमित्त फॅशनेबल कपड्यांची विक्री करतो. कुर्ता, पठाणी ड्रेस, टोप्या या ईदच्या काळातच जास्त विक्री होतात. दोन महिन्यांपूर्वी माल खरेदीसाठी अॅडव्हान्स दिला होता. परंतु, माल आणता आला नाही. हे नुकसान कसे भरुन काढायचे याची चिंता आहे. पण लॉकडाऊन कायम असलेला बरा आहे.