मोठी बातमी; सोलापुरातील प्रमुख २२ चौकांवर १४६ कॅमेऱ्यांची राहणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:29 PM2022-03-04T17:29:45+5:302022-03-04T17:29:51+5:30
स्मार्ट सिटीच्या बैठकीत निर्णय : सुधारित जलवाहिनीसाठी निधीच्या तरतुदीत वाढ
सोलापूर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील १४६ ठिकाणे व २२ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी स्थापित सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालक मंडळाची २८ वी बैठक कंपनीचे अध्यक्ष असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. या बैठकीला महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त हरिश बैजल, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी ते सोलापूर अशा समांतर जलवाहिनीच्या कामात शासनाने केलेल्या बदलाची चर्चा करण्यात आली. २०३५ची लोकसंख्या विचारात घेऊन स्मार्ट सिटी योजनेत यापूर्वी ११० एमएलडी जलवाहिनीची ४५३ कोटी खर्चाची योजना तयार करण्यात आली होती.
या कामासाठी स्मार्ट सिटी योजनेतून २०० व एनटीपीसीकडून २५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शासनाने योजनेची क्षमता १७० एमएलडी केली आहे. त्यामुळे सुधारित योजनेला आता ८०१ काेटी रुपये लागणार आहेत. यासाठी शासनाकडून २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर उर्वरित रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादनाचे काम झाले असून, उरलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
इंटिग्रेटेड कंट्रोल सेंटर उभारणार
स्मार्ट सिटी योजनेत शहरासाठी आवश्यक असे इंटिग्रेटेड कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी ४९ कोटींची तरतूद केली आहे. पोलिसांच्या मदतीने शहरातील महत्त्वाची १४६ ठिकाणे व २२ चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येतील. कमांड कंट्रोल सेंटर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात येईल. पुढील वर्षात हे काम पूर्ण करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.