मोठी बातमी; उजनीच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदी पात्रात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 12:06 PM2021-10-10T12:06:32+5:302021-10-10T12:07:25+5:30
सोलापूर लोकमत न्युज नेटवर्क
टेंभुर्णी : उजनी धरण तुडुंब भरल्यामुळे रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत असून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
१२३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या १२२.१७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरण १०९.२२ टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त साठाही५८.५१ टीएमसी झाला आहे. दौंड येथून १०५५१ क्युसेक्स विसर्ग चालू आहे.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने व दौंड येथून येणारा विसर्ग वाढल्याने पूरनियंत्रण करण्यासाठी उजनीचे १६ दरवाजे उघडून त्यातून २० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याचबरोबर रविवारी सकाळी ११ वाजता धरणाच्या मुख्य कालव्यातून ७००क्युसेक तर भीमा-सीना बोगद्यातून २०० क्युसेक पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग विचारात घेऊन धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त केला जाईल असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने म्हटले आहे. याच बरोबर भीमा नदी काठावरील लोकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.