मोठी बातमी; शेतीपंपाच्या वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २३ दिवस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 04:25 PM2022-03-07T16:25:12+5:302022-03-07T16:25:16+5:30
वसुली मोहीम तीव्र; कमी अंतरावरील कृषी जोडण्या सुरू होणार
सोलापूर : शेती वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २६ दिवस शिल्लक राहिले असून, शेतकऱ्यांनी थकीत बिलाची ५० टक्के रक्कम भरून कृषिपंपाचे वीज बिल कोरे करावे. शेती वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २४ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, कमी अंतरावरील कृषी जोडण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचेही महावितरणच्या सूत्राने सांगितले.
महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणून राज्यातील शेतकऱ्यांना वीज थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी मोठी सवलत दिली आहे. यामध्ये सप्टेंबर २०२० अखेर असलेल्या थकबाकीतील दंड-व्याज माफ करून, व्याजाचे पुनर्रगठण करून, वीज बिलाची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली आहे. या सुधारित थकबाकीवर ५० टक्के माफी देऊन शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्याचे व वसूल रकमेतील ६६ टक्के ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेला अधिक सक्षम करून गुणवत्तापूर्ण वीज शेतीला देण्याचे शासनाचे धोरण आहे.
शेतीपंपाचे कनेक्शन देताना बारामती परिमंडलाने जिथे खांब लागत नाही अशा ३० मीटर अंतराच्या आतील जोडण्या युद्धपातळीवर दिल्या. आता ३१ ते २०० मीटर अंतरामधील जोडण्या देण्याचे काम हाती घेतले असल्याचे महावितरणने सांगितले.
---------
संपूर्ण चालू वीज बिल भरले तरच वीजपुरवठा...
अनेक भागात काही शेतकरी जुजबी रक्कम भरून पैसे भरल्याचे सांगत आहेत. मात्र, या कालावधीत सप्टेंबर २०२० पासून आलेली शेतीची सर्व त्रैमासिक बिले भरणे सक्तीचे आहे. ही संपूर्ण चालू बिलाची रक्कम भरल्याशिवाय खंडित केलेला वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. जर योजनेच्या कालावधीत काही रक्कम भरली असेल तर उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी सप्टेंबर २०२० पासूनची सर्व चालू बिले भरावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.