मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:50 PM2024-06-26T15:50:06+5:302024-06-26T15:50:26+5:30
यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या ७ जुलैपासून पंढरपुरातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीच्यावतीने माध्यमांना देण्यात आली. आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
येत्या १७ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते विणा, वाकरी पटका, श्रींची मुर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे.