मोठी बातमी; सोलापुरात ३० नव्हे ३०० बसेस धावणार; खासगी कंपनीची मदत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 04:49 PM2022-04-22T16:49:15+5:302022-04-22T16:49:22+5:30
खासगी कंपनी बस चालवणार : महापालिकेला देणार पैसे
सोलापूर : सध्या शहरात महापालिकेच्या ३० बस सुरू आहेत. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता शहरात ३०० बस सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या वतीने पावले उचलण्यात येत असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या परिवहन संचालकाचा पदभार हा आयुक्तांनी स्वीकारला आहे. त्यानंतर शहरातील बस सेवा कशा पद्धतीने सुरू करता येइल याची पाहणी केली. त्यानंतर शहरात ३०० बसची गरज असल्याचे स्पष्ट झाले. शहरात खासगी तत्त्वावर बस चालविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बोलणी झाली होती. मात्र त्यांनी आधी पैसै मागितले. सध्या महापालिकेकडे पैसे नाहीत. पीएमपीएमएलने बस चालविण्यासाठी किलोमीटरचा दर ठरवून तो महापालिकेला द्यावा अशी मागणी सोलापूर महापालिकेकडून करण्यात आली. मात्र, बोलणी यशस्वी झाली नाही.
महापालिकेला शहरातील बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करणे शक्य नाही. यासाठी विविध पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरात बस सेवा चालविण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका खासगी कंपनीकडून निविदा मागविणार आहे. यामुळे शहराच्या विविध मार्गावर ३०० बस सुरू करण्याचे नियोजन आहे.
महापालिकेचा परिवहन उपक्रमाचे खासगी करण्यासाठी खासगी तत्त्वावर चालण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. आयुक्तांनी यापूर्वी एक प्रस्ताव महापालिकेच्या परिवहन समिती व सभागृहाला दिला होता. हा प्रस्ताव सभागृहाने फेटाळला. महापालिकेच्या सभागृहाने घेतलेला निर्णय विखंडित करण्यासाठी तो नगर विकास खात्याकडे पाठविला होता.
----------
नव्या मार्गांची चाचपणी
शहर आता विस्तारले असून अनेक भागात रहदारी वाढली आहे. शहराच्या गावठाण भागात अनेक नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यांच्या प्रवासासाठी सोय असणे गरजेचे आहे. सध्या शहरात फक्त ३० बस धावत असून त्या अपुऱ्या आहेत. भविष्यात बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी शहरात नवे मार्ग सुरू करता येतील का याची चाचपणी करण्यात येणार आहे. विजापूर रोड, होटगी रोड, अक्कलकोट रोड, हैद्राबाद रोड आदी परिसराच्या आतील भागात बसची अधिक आवश्यकता आहे.