मोठी बातमी; सोलापुरातील ४०० स्टेशन मास्तर एक दिवस सुट्टीवर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 06:39 PM2022-05-23T18:39:22+5:302022-05-23T18:39:28+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; केंद्र सरकारविरोधात रेल्वे कर्मचारी आक्रमक
सोलापूर : रेल्वेचे सुरू असलेले खासगीकरण बंद करावे, स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात, स्टेशन मास्तरांना तणाव भत्ता त्वरित लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील ३५ हजार स्टेशन मास्तर एक दिवस सामूहिक रजेवर जाणार आहेत. या संपात सोलापुरातील ४०० स्टेशन मास्तरांचा सहभाग असणार आहे.
अखिल भारतीय स्टेशन मास्तर असोसिएशनच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी ३१ मे २०२२ रोजी सामूहिक रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबर २०२० रोजी याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. तिसऱ्या टप्प्यात २० ते २६ ऑक्टोबर २०२१ या आठवड्यात काळ्या फिती लावून देशभरातील स्टेशन मास्तरांनी विरोध दर्शविला होता. तसेच चौथ्या टप्प्यात ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस उपाशी राहून काम केले व पाचव्या टप्प्यात धरणे आंदोलन केले. तरीही प्रशासनाने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. यामुळे संघटनेने आता यापुढील आंदोलने तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
-------
या आहेत मागण्या...
- - स्टेशन मास्तरांना सुरक्षा व तणावमुक्तीसाठी भत्ता द्यावा
- - स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात
- - रात्रपाळीची सिलिंग मर्यादा ४३ हजार ६०० रुपयांचा आदेश रद्द करावा
- - एम. ए. सी.सी.पी.चा लाभ १ जानेवारी २०१६ पासून लागू करावा
- - स्टेशन मास्तर पदनाम परिवर्तनासोबतच केडरचे शुद्ध वर्गीकरण करावे
- -रेल्वेचे खासगीकरण बंद करावे
- - नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करावी
---------
३१ मे २०२२ रोजीचे स्टेशन मास्तरांचे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची मागणी आहे. यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करूनही यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे यापुढील आमची आंदोलने तीव्र असणार आहेत.
- संजय अर्धापुरे, सोलापूर मंडल अध्यक्ष, अखिल भारतीय स्टेशन मास्तर असोसिएशन