मोठी बातमी; राज्यातील ५७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे ७९९ कोटी थकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 12:03 PM2021-07-09T12:03:50+5:302021-07-09T12:05:39+5:30
११३ कारखाने एफआरपीत क्लेअर; आरआरसी केलेल्या ३२ पैकी ३ कारखान्यांनी दिली संपूर्ण रक्कम
सोलापूर : राज्यातील १३३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा अधिक रक्कम दिली असली तरी ५७ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७९९ कोटी ३६ लाख रुपये थकविले आहेत. मागील वर्षीच्या गाळप हंगामासाठी तब्बल ३२ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.
मागील हंगाम राज्यातील १९० साखर कारखान्यांनी घेतला होता. त्यापैकी १३३ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ५७ साखर कारखान्यांनी मात्र, ७९९ कोटी ३६ लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. साखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाऱ्या ३२ साखर कारखान्यांची आरआरसी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २३ हजार ७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एफआरपीपेक्षा ३५ कोटी ९५ लाख रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती...
- सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी, जनहित शेतकरी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या वतीने गेल्या पाच महिन्यांत साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर सहसंचालकांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली. तरीही ४५४ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत.
- - साखर सहसंचालक कार्यालयाच्या मते २२५ कोटी ५२ लाख रुपये थकले असून पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, लोकनेते, सिद्धेश्वर, सासवड माळी शुगर हे कारखाने शेतकऱ्यांसोबतच्या कराराप्रमाणे बैलपोळा व दिवाळी सणाला देणार आहेत. त्यामुळे देय रक्कम ४५४ कोटी ५३ लाख रुपये दिसत आहेत.
- - २ हजार ५२९ कोटी ८४ लाख रुपये (एकूण एफआरपीच्या ९२.९६ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.