मोठी बातमी; ९० हजार क्विंटल मका शिल्लक; खरेदीचे पोर्टल मात्र झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:51 PM2020-12-26T12:51:34+5:302020-12-26T12:51:41+5:30
उद्दिष्ट पूर्ण : अकरा हमीभाव केंद्रावर २५ हजार क्विंटलची खरेदी
सोलापूर : जिल्ह्यात जवळपास ९० हजार क्विंटल मका शिल्लक असताना सर्वच ११ हमीभाव खरेदी केंद्र पोर्टल बंद करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक मका खरेदी झाल्याने केंद्र बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राज्यात यंदा चांगला पाऊस पडल्याने मकेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, एकरी उताराही चांगला पडला असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती त्यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्राला ३ लाख ४९ हजार क्विंटल मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. उशिराने मका खरेदी सुरू झाली त्यात खरेदी झालेली मका भरण्यासाठी पोती बारदाणा सरकारने उशिराने पुरवठा केला. मका खरेदीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ केंद्रावर ६ हजार २०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी अवघ्या ९९६ शेतकऱ्यांची २५ हजार ३६५ क्विंटल मका खरेदी झाली आहे. या खरेदी केलेल्या मकेचे चार कोटी ६९ लाख २५ हजार २५० रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी मकेला चांगला उतारा पडल्याने एक ३७ हजार क्विंटल उत्पादन होईल, असा पणन खात्याचा अंदाज आहे. यापैकी २५ हजार क्विंटल मका पणन खात्याने खरेदी झाली आहे. आणखी ८० ते ९० हजार क्विंटल मका शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचा अंदाज आहे. नोंदणी झालेल्या ६,२०० शेतकऱ्यांपैकी ९९६ शेतकऱ्यांची मका खरेदी झाली असताना ५,२०४ शेतकऱ्यांकडे मका शिल्लक आहे.
- राज्यभरात ३ लाख ४९ हजार क्विंटल मका खरेदीला केंद्राने मान्यता दिली होती. प्रत्यक्षात चार लाख १२ हजार क्विंटल मका खरेदी झाली आहे.
- 0 क्विंटलला १,८५० रुपये इतका हमीभाव
- 0 बार्शी, कुर्डुवाडी, करमाळा, अनगर, पंढरपूर, मंगळवेढा, मरवडे, सांगोला, अक्कलकोट, नातेपुते ही मका खरेदी केंद्र.
मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टल बंद झाले आहे. खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्यात अंदाजे ९० हजार क्विंटल मका शिल्लक आहे.
- भास्कर वाडीकर
जिल्हा पणन अधिकारी, सोलापूर