मोठी बातमी; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांवर पुण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 03:48 PM2022-07-18T15:48:40+5:302022-07-18T15:48:46+5:30
पिडीत महिलेने केलेल्या तक्रारीची घेतली दखल
सोलापूर : पिडीत महिलेनेच्या केलेल्या तक्रारीवरून भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती लोकमत ला मिळाली आहे.
श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केला होतं. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचं कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या नंतर देशमुख यांनी पदावरचा राजीनामा दिला होता. आता या सर्व प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महिलेने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून श्रीकांत देशमुखांचा फोन लागत आहे.
--------------
भाजपच्या आणखी एका जिल्हाध्यक्षाविरुद्ध
सोलापुरातील पीडितेची महिला आयाेगाकडे धाव
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे बेडरूममधील व्हिडिओ प्रकरण ताजे आहे. त्यातच साेलापुरातील एका महिलेने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश माेहिते यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रार प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी राज्य महिला आयाेगाकडे केली आहे. साेलापुरातील महिलेने ६ मे २०२२ राेजी नवी मुंबई पाेलीस आयुक्तांकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीत म्हटले हाेते की, माझा २०११ मध्ये अलिबाग जि. रायगड येथील एका व्यक्तीशी विवाह झाला हाेता. काही वर्षांतच घटस्फाेट झाला. यानंतर माझी महेश माेहिते यांच्याशी मैत्री झाली. आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांनी त्यांचा घटस्फाेट झाल्याचे दाखविले. त्यामुळे त्यांच्यासाेबत मी ६ ऑक्टाेबर २०१५ राेजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला. यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. माझ्यावर अत्याचार झाला. माझा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकीही दिली. मला व माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धाेका असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले हाेते. या महिलेने राज्य महिला आयाेगाकडे एप्रिल महिन्यात तक्रार केली हाेती. श्रीकांत देशमुख यांचे प्रकरण समाेर आल्यानंतर या महिलेने शनिवारी पुन्हा महिला आयाेगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि साेलापूर पाेलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले याबद्दल कळवावे अशी मागणी केली आहे.