मोठी बातमी; पासपोर्टसाठी बनावट दाखला जोडला; ७० वर्षीय वृद्धेला सहा महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 10:50 AM2022-05-10T10:50:15+5:302022-05-10T10:50:21+5:30
मुख्य न्यायदंडाधिकारी : २० वर्षांनंतर लागला निकाल
सोलापूर : पासपोर्ट काढण्यासाठी बनावट शाळेचा दाखला जोडल्याबद्दल तब्बल २० वर्षांनंतर वृद्ध महिलेला मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली. नादनबी राजअहमद मुल्ला (वय ७०, रा. शास्त्री नगर, सदर बझार, सोलापूर), असे शिक्षा झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. नादनबी मुल्ला यांनी १२ एप्रिल २००२ रोजी पासपोर्ट काढण्यासाठी पुणे येथील पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला होता.
अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांची छाननी कjण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडे पाठवण्यात आले होते. छाननीदरम्यान नादनबी मुल्ला यांचा ऊर्दू शाळा क्र.१ चा दाखला खोटा असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात दि.८ जुलै २००२ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती. ज्ञानेश्वर देवकते यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. आरोपी विरुद्ध चार साक्षीदारांनी साक्ष पुरावा नोंदविला. साक्षीदार ऊर्दू शाळा क्र.५ चे मुख्याध्यापक मोहम्मद शेख यांनी शाळेचा दाखला बनावट असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपी ही वयस्कर असून तिला कोणताही आधार नाही. त्यामुळे तिची शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायाधीशांनी सहा महिने साधा कारावास व ५०० रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. अझमोद्दीन शेख व ॲड. येमूल यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून ज्योती बेटकर यांनी काम पाहिले.