मोठी बातमी; ‘अंनिस’ आक्रमक..महाराज गायब; आश्रम म्हणे लॉकडाऊनमुळे बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 01:16 PM2021-08-30T13:16:07+5:302021-08-30T13:32:13+5:30

हमीद दाभोळकर सरसावले: मामांच्या कारभाराची पाळंमुळं खणून काढणार

Big news; ‘Annis’ aggressive..Maharaj disappears; Ashram closed due to lockdown! | मोठी बातमी; ‘अंनिस’ आक्रमक..महाराज गायब; आश्रम म्हणे लॉकडाऊनमुळे बंद!

मोठी बातमी; ‘अंनिस’ आक्रमक..महाराज गायब; आश्रम म्हणे लॉकडाऊनमुळे बंद!

Next

सोलापूर/करमाळा : उंदरगावात (ता. करमाळा) आश्रम उघडून स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचा दावा करत सर्वसामान्यांपासून अगदी उच्चभ्रू लोकांचीही फसवणूक करणाऱ्या मनोहरमामांची पोलखोल करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. हमीद दाभोळकर सरसावले असून, यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. आता ‘मामा’ गायब झाले असून, आश्रम लॉकडाऊनमुळे बंद असल्याचे सांगण्यात आले.

‘लोकमत’ने मनोहरमामांच्या ‘मनोहरी बुवाबाजी’वर प्रकाश टाकला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘मामां’ बद्दल येत असलेल्या तक्रारींचा ‘अंनिस’ ने ऊहापोह केला आहे. पोलिसांच्या सहाय्याने फसल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा या संघटनेने विडाच उचलला आहे. यासाठी स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीमध्ये ‘अंनिस’ कार्यकर्ते डॉ. अशोक कदम, निशा भोसले, प्रशांत पोतदार, केदारीनाथ सुरवसे, भगवान रणदिवे यांचा समावेश आहे.

‘अंनिस’ने नमूद केले आहे की, राजकारणी आणि पोलीस दलातील अनेकजण आपले भक्त असल्याचे भासवून लोकांच्या असहाय्य मानसिकतेचा गैरफायदा घेतला जातो. आपल्याकडे भूतप्रेत उतरवण्याची शक्ती आहे, असा दावा करून लोकांना फसवले जाते. गोरगरिबांकडून देखील मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. शिवाय मामांच्या तीर्थामुळे एका वृध्दाचा मृत्यू झाला. अशाच अनेक गोष्टी उंदरगाव येथील मठात होत असल्याच्या पीडित व्यक्तींच्या तक्रारी महाराष्ट्र ‘अंनिस’कडे आल्या आहेत. उंदरगावमधील अनेक सुजाण नागरिक देखील या गोष्टींना वैतागले आहेत तेही आमच्यासोबत उभे राहात आहेत.

भुताने झपाटणे किंवा करणी असे कोणतेही प्रकार प्रत्यक्षात नसतात. लोकांना फसवण्याचे हे प्रकार आहेत तसेच दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या माध्यमातून लोकांना फसवणे आणि ठकवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे हे लोकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून अनेक पीडित लोक उंदरगाव येथे अमावस्येला दरबार भरतो तेव्हा येतात, अशी स्थानिक लोकांची माहिती आहे. हा सर्व प्रकार धर्मादाय संस्थेच्या नावाच्या खाली चालू असल्याचे देखील समोर येत आहे. महाराष्ट्र ‘अंनिस’ने या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचे ठरविले असल्याचेही स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात लागू जादूटोणा विरोधी दक्षता कायद्यांतर्गत दक्षता अधिकारी ही तरतूद आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा जागी जाऊन पाहणी आणि चौकशी करू शकतात. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने चौकशी करून ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा ‘अंनिस’ने व्यक्त केली.

दरम्यान,मनोहर मामा अकस्मातपणे गायब झाल्यानं तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील उंदरगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मनोहर महाराजाचा आश्रम आहे. सध्या आश्रमाचे मोठे बांधकाम सुरू आहे. भविष्य पाहण्यासाठी येणाऱ्या भक्ताकडून तीन हजारापासून ते एकवीस हजार रुपयांपर्यंतची देणगी गोळा केली जात असल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. आश्रमात राजकीय नेते मंडळी व बडे अधिकारी नियमित येत असल्याने कोणी जाहीरपणे विरोध व तक्रार करु शकत नव्हते. आता मात्र अनेकजण पुढं सरसावू लागलेत. नाव न छापण्याच्या अटीवर अनेकांनी भक्तांची लूट होत असल्याचे सांगितले.

------

फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी : सरपंच

मनोहर भोसले यांच्या आश्रमात बुवाबाजी करून भक्तांची फसवणूक होत असल्याबाबतचे वृत्त 'लोकमत'मधून वाचले. भक्तांची फसवणूक होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. फसवणूक झालेल्या भक्तांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करावी. प्रशासनाकडे निवेदन देऊन पाठपुरावा करू.

-हनुमंत नाळे, सरपंच, उंदरगाव

.. पण एक भक्त म्हणतो

मनोहर मामा केवळ ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून भविष्य सांगतात. कुठलाही चमत्कार करून दाखवत नाहीत. अनेक वर्षे मामांनी फुकट सेवा दिली आहे. मात्र गर्दी वाढू लागल्याने त्यांच्या बसण्याची सोय व्हावी, म्हणून भक्तांच्या सोयीसाठी भक्तगण देणगी देतात. मामांची लोकप्रियता वाढू लागल्यानेच विनाकारण बदनामी सुरू केली आहे.

- अर्जुन जाधव, चित्रपट कलाकार व मनोहर मामांचा भक्त.

Web Title: Big news; ‘Annis’ aggressive..Maharaj disappears; Ashram closed due to lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.