मोठी बातमी; तोडगा निघाला अन् वारकरी जिंकले; प्रशासनाने नमतं घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 09:22 PM2021-07-19T21:22:05+5:302021-07-19T21:23:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
मोहन डावरे
पंढरपुर : आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या वेशीवर आलेल्या वारकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासनाने नमते घेत 30 वारकऱ्यांना पालखीसोबत पंढरपूरमध्ये चालत जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे सर्व आता पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
आषाढी यात्रेसाठी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून एसटी बसने आलेल्या वारकऱ्यांनी वाखरी येथे आल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आणि पायी चालत सर्व ४० वारकऱ्यांसह पंढरीत जाऊ अन्यथा इथेच थांबू अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासन हवालदिल झाले होते. यापूर्वी शासनाने वाखरी ते विसावा इथपर्यंत प्रत्येक पालखी सोबत ४० वारकरी आणि विसावा येथून पंढरपूरपर्यंत प्रत्येक पालखी सोबत २ वारकऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र वारकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारून जाऊ तर सर्व ४० नाही तर नाही अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकरी ठाम होते. शेवटी वाखरी ते इसबावी विसावा एसटी बसमधून आणि तिथून पंढरपूर पर्यंत ३० वारकरी प्रत्येक पालखी सोबत पायी जाण्याचा तोडगा प्रशासनाने मान्य केला आणि वारकऱ्यानी समाधान व्यक्त करीत पालख्या पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.