मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात 'पंतप्रधान किसान सन्मान' योजनेतील बनवेगिरी उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 01:28 PM2020-11-01T13:28:52+5:302020-11-01T13:29:43+5:30

मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील २ हजार ६०० बोगस लाभार्थींकडून २ कोटी रुपयांची वसुली होणार

Big news; Banvegiri in 'Prime Minister's Farmer Honor' scheme revealed in Mangalvedha taluka | मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात 'पंतप्रधान किसान सन्मान' योजनेतील बनवेगिरी उघड 

मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात 'पंतप्रधान किसान सन्मान' योजनेतील बनवेगिरी उघड 

Next

मल्लिकार्जुन देशमुखे


मंगळवेढा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या ४० हजार ७१ लाभार्थी  शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील ८१ गावातील तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झालेली २ कोटी रुपये रकमेची  वसुली करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान बनवेगिरी करून लाटलेली रक्कम तात्काळ परत न केल्यास त्यांच्या सात बारा उताऱ्यावर बोजा चढवण्यात येणार आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा  यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतात. ठराविक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जाहीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी अपात्र असतानाही नोंदणी केली. विशेष म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले.

आता योजनेच्या पुढील टप्प्यातील तरतुदीनुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये अनेकांचे पितळ उघड पडत आहे. अपात्र लाभार्थ्यांना योजनेच्या यादीतून हटविण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जाणार आहेत. ज्यांनी खात्यातून पैसे काढून खर्च केले आहेत, त्यांच्यासाठी विशेष वसुली पथके नियुक्त करून मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे पैसे भरण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये सरकारला परत करायचे पैसे भरले जाणार आहेत. अशा अपात्र लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सांगितले.

या योजनेच्या निकषानुसार जर शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण संबंधित शेतकरी त्याचा उपयोग दुसऱ्या गोष्टीसाठी करत असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही. जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर तोही या योजनेसाठी अपात्र ठरणार. जर संबंधित शेतकरी करदाता असेल तर तोही यासाठी अपात्र ठरणार आहे. प्रत्यक्षात या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेकांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे पडताळणीत आढळून आले आहे अशी माहिती या विभागाचे ओहोळ व महावीर माळी यांनी दिली. तालुक्यातील ४० हजार ७१  लाभार्थ्यांमध्ये तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थ्यांच्या खात्यांत दोन कोटी रुपयांपर्यंत  रक्कम भरली गेली आहे. ती वसूल करण्यासाठी आता ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामध्ये ७४५ आयकर भरणारे व  १ हजार ८५५ इतर कारणांनी अपात्र ठरले आहेत यांच्यासाठी तहसीलदार रावडे यांनी तालुकास्तरापर्यंत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.  वसुली पथके गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेणार आहेत. त्यांच्या नावांच्या यादीचे  जाहीरपणे वाचन करून त्यांना घेतलेले पैसे पुन्हा भरण्याची सूचना देण्यात येणार आहे.

----------------
पीएम किसान सन्मान योजनेसाठी तालुक्यात ४० हजार ७१  लाभार्थी यासाठी पात्र ठरले.  यातील २ हजार ६०० लाभार्थी अपात्र आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यावरील २ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. ते  वसुल करण्यासाठी संबंधित तलाठींना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. जे लाभार्थी ती रक्कम भरणार नाहीत त्यांच्या सातबारा उताऱ्यावर तेवढ्या रकमेचा बोजा चढवण्यात येणार आहे
-स्वप्निल रावडे, तहसीलदार, मंगळवेढा

Web Title: Big news; Banvegiri in 'Prime Minister's Farmer Honor' scheme revealed in Mangalvedha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.