मोठी बातमी; पाणी, ड्रेनेजची कामे वेळेत न करणारे मक्तेदार काळ्या यादीत
By Appasaheb.patil | Published: January 1, 2023 05:55 PM2023-01-01T17:55:11+5:302023-01-01T17:59:59+5:30
पाणी, ड्रेनेजची कामे वेळेत न करणाऱ्या मक्तेदारांकडून ती कामे काढून घ्यावीत. उर्वरित कामांचे नव्याने टेंडर काढावे.
सोलापूर : पाणी, ड्रेनेजची कामे वेळेत न करणाऱ्या मक्तेदारांकडून ती कामे काढून घ्यावीत. उर्वरित कामांचे नव्याने टेंडर काढावे. जे मक्तेदार वेळेत कामे करणार नाहीत अशा मक्तेदारांना काळ्या यादीत टाका, त्यांना दंड करा, त्यांची सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम जप्त करा, असे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आयोजित पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत विविध योजनांचा आढावा घेतला. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पाणीपुरवठा विभागप्रमुख संजय धनशेट्टी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाणी, ड्रेनेजची शहरात किती कामे सुरू आहेत, किती कामे प्रलंबित आहेत याबाबतची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. प्रलंबित कामे का प्रलंबित आहेत याबाबतचाही आढावा घेतला. दरम्यान, शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाला नव्याने अभ्यास करावा, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.
अखर्चित निधी शासनाकडे वर्ग करणार
शासनाच्या विविध योजना व जिल्हा विकास यंत्रणेकडून मिळालेला निधी कामे करूनही अखर्चित राहिला असेल तर तो शासनाकडे वर्ग करण्याच्या सूचना शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ज्या ज्या योजनांचा अखर्चित निधी आहे तो शासनाकडे वर्ग करण्याच्याही सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना केल्या आहेत.
वेळेत कामे करण्यास प्राधान्य
शहरात अमृत योजनेतून अनेक कामे सुरू आहेत. शिवाय महापालिका, शासन व जिल्हा विकास यंत्रणेकडून मिळालेल्या निधीतूनही विविध पाणीपुरवठ्यांची कामे सुरू आहेत. ती मक्तेदारांकडून वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पाणीपुरवठा विभाग सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले.