मोठी बातमी; कनिष्ठांसाठी पाचशेची लाच घेताना अभियंत्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 10:39 AM2022-06-24T10:39:20+5:302022-06-24T10:39:25+5:30
पाणीपुरवठा विभाग : दोन साहाय्यकांनाही घेतले ताब्यात
सोलापूर : पाणीपुरवठा पाइपलाइन कामाचे अंदाजपत्रक लवकर तयार करून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मोहोळमधील शाखा अभियंता हेमंत राजाभाऊ विधाते (वय ५०) याने कनिष्ठ सहायक व स्थापत्य अभियंता सहायक यांच्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी विधाते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
हिंगणी गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडून पाणीपुरवठा पाइपलाइन कामास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मंजूर पाणीपुरवठा पाइपलाइन करण्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, उपविभाग मोहोळ येथे गेले असता तेथे शाखा अभियंता हेमंत विधाते याने अंदाजपत्रक लवकर तयार करून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्यासाठी आरोपी कनिष्ठ सहायक सिद्रामप्पा मल्लिकार्जुन वैधकर (वय ४३) याच्यासाठी दोनशे रुपये व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गंगाधर हणमल्लू फुलानुवर (वय ३३) याच्यासाठी तीनशे रुपये लाचेची मागणी केली.
या प्रकरणांमध्ये आरोपी वैधकर व फुलानुवार या दोघांनीही संमती दिली. या दोघांसाठी विधाते याने पाचशे रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस आमदार सोनवणे, घाडगे, सण्णके यांनी केली.