मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील ३२५ सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 12:56 PM2021-06-09T12:56:21+5:302021-06-09T12:56:29+5:30
कोरोनाचा परिणाम : वैयक्तिक स्वच्छतागृह बांधणीला दिली गती
सोलापूर : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील ३२५ सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून लटकले आहे. त्यामुळे घरगुती वैयक्तिक स्वच्छतागृहाच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी सन २०१२ मध्ये घरगुती शौचालयाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १ लाख ८८ हजार ३५२ कुटुंबाकडे आधीच शौचालय होती तर शौचालय नसलेल्या २ लाख ५२ हजार ३१७ कुटुंबीयांना वैयक्तिक अनुदान देऊन बांधकाम करून घेण्यात आले. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला. यामध्ये सर्वेक्षणातून सुटलेल्या १८ हजार ७९१ व नंतर विभक्त आणि इतर अशा ७ हजार २८० कुटुंबीयांना लाभ देण्यात आला. सर्वेक्षणात आलेले २७ हजार कुटुंबीयांचा शोध घ्यावा लागला. यात ५ एकरपेक्षा जास्त शेती असलेल्यांना लाभातून वगळण्यात आले. दुबार नावे व मृत, पत्त्यावर राहत नसलेले अशी २१ हजार १३९ नावे निवड यादीतून डिलीट करण्यात आली आहेत.
बऱ्याच गावातील वस्त्यांवर स्थलांतरित कुटुंब राहतात. ऊसतोड व इतर कामानिमत्त हे कुटुंबीय इतर ठिकाणी जातात व फक्त पावसाळ्यात घरी परतत. अशा कुटुंबीयांसाठी सार्वजनिक शौचालय योजना सुरूच ठेवण्यात आली आहे; पण गेल्या दोन वर्षांत ३२५ सार्वजनिक शौचालय बांधता आलेली नाहीत. वाळूची टंचाई व कोरोना महामारी यामुळे हे काम झालेले नाही, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांनी सांगितले. एप्रिलमध्ये ५० गावांना सार्वजनिक शौचालय बांधणीला मंजुरी दिली आहे व यासाठीचा निधी पंचायत समित्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. चालू वर्षी वैयक्तिक शौचालयाचे ३ हजार ८७८ उद्दिष्ट असून ३ हजार २६ चे बांधकाम पूर्ण झाले आहे.
असा आहे शिल्लक निधी
मागील वर्षी स्वच्छतागृहासाठी २ कोटी ९४ लाख खर्च झाले व २७ कोटी १० लाख शिल्लक आहेत. चालू वर्षी नव्याने ९ हजार ९८३ शौचालये मंजूर केली असून, शिल्लक निधी यावर खर्च करण्यात येणार आहे. ३२५ सार्वजनिक शौचालयाचा ३ कोटी ९ लाख ६० हजारांचा निधी शिल्लक आहे. सांडपाण्यासाठी १ कोटी ८३ लाख निधी तर कर्मचारी वेतनासाठी ४२ लाख शिल्लक आहेत. याशिवाय जागितक बँकेकडून आलेले पैसे शिल्लक असून, हा निधी खर्च करू नये, अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत.
तालुकानिहाय शौचालयाची संख्या
- अक्कलकोट : ४१४०५
- बार्शी : ४८८१०
- करमाळा : ३९५६२
- माढा : ४५३२६
- माळशिरस : ७५७१२
- मंगळवेढे : ३२९१८
- मोहोळ : ४२१११
- पंढरपूर : ५४४३८
- सांगोला : ५२५६४
- उ. सोलापूर : १६३८९
- द. सोलापूर : ४०३०७