मोठी बातमी; गायीच्या दूध खरेदीदरात सहा महिन्यांत दहा रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 02:32 PM2021-02-05T14:32:38+5:302021-02-05T14:33:49+5:30
तीस रुपयांपर्यंत गेला भाव : दरात स्थिरता राखण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा
सोलापूर: केवळ सहा महिन्यांत गाईच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर १० रुपयाने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात १९ रुपयांवर आलेला दर फेब्रुवारीमध्ये २९- ३० रुपये इतका झाला आहे. दराला अधिकचा दर मिळावा, ही बाब हिताची असली तरी दर स्थिर रहावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
अलीकडे दूध व्यवसायावर शासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने दर दहा दिवसांनी दूध खरेदीदरात बदल होतो. यामुळेच दूध व्यवसायात स्थिरता राहिली नाही. ‘कोरोना’मुळे जुलै महिन्यात दूध खरेदीदर प्रतिलिटरला १९ रुपये इतका झाला होता. दर घसरल्याने काही सहकारी संघाचे दूध शासन खरेदी करीत होते. त्यामुळे सहकारी संघ प्रतिलिटर २५ रुपये तर खासगी संघ १८ ते १९ रुपये दर देत होते. सप्टेंबर महिन्यात हा दर वाढून २० ते २२ रुपये ५० पैसे इतका झाला होता. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दीड ते अडीच रुपयांनी वाढ झाली आहे. खासगी दूध उत्पादक संघाने ऑक्टोबर महिन्यात प्रतिलिटरला २४ ते २५ रुपये तर सहकारी संघाने २२ रुपये ५० पैसे दर दिला होता. डिसेंबर महिन्यात जिल्हा दूध संघाने २४ रुपये दर दिला तर खासगी संघाचा दर २५ रुपये होता.
जानेवारी महिन्यात १ ते २० जानेवारी या कालावधीत २५ रुपये ५० पैसे तर २१ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत २६ रुपये ५० पैसे दर दूध उत्पादकांना सहकारी संघाने दिला. खासगी संघांनी २७ रुपये दर दिला होता. १ फेब्रुवारीपासून पुन्हा दूध खरेदीदरात दोन ते अडीच रुपयांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.
पावडरच्या दरात वाढ
जुलै महिन्यात दूध पावडरीचे दर प्रतिकिलो १४० रुपयांवर आले होते. दर कमी-अधिक होत होते. मात्र, मागील काही दिवसांत दरात वरचेवर वाढ होत प्रतिकिलोचा दर २५० रुपयांवर गेला असल्याचे सोनाई दूध संघांच्या दशरथ माने यांनी सांगितले. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ झाल्याचे माने यांनी सांगितले.
अस्थिरता न परवडणारी : कुतवळ
दर दहा दिवसांनी बदलणारे दर शेतकरी दूध उत्पादकांना परवडणारे नाहीत. तात्पुरती दरवाढ करायची व पुन्हा काही दिवसांनी दरात मोठी घसरण करायची, हा प्रकार शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा आहे. किमान चार- सहा महिने तरी वाढलेला दर स्थिर ठेवला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी ''लोकमत'' शी बोलताना सांगितले.
जागतिक बाजारपेठेत पावडर व बटरच्या दरात वाढ झाल्याने दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात खरेदी होणाऱ्या दुधाला प्रतिलिटर २७-२८ रुपये असलेला दर फेब्रुवारी महिन्यात २९ -३० रुपये शेतकऱ्यांना मिळेल.
- दशरथ माने
अध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर
खासगी संघाच्या स्पर्धेत आम्हीही दूध उत्पादकांना दर देणार आहोत. दूध उत्पादकांना मागील महिन्यात २६ रुपये ५० पैसे दर दिला तर फेब्रुवारी महिन्यात किमान दोन रुपयांनी वाढ होईल. शेतकऱ्यांचे दुधाचे पैसे दर दहा दिवसांनी दिले जात आहेत.
- दिलीप माने, अध्यक्ष,सोलापूर जिल्हा सोलापूर