मोठी बातमी; अंत्यविधीवेळी गर्दीचे निर्बंध शिथिल, सलूनवरील निर्बंध मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 05:08 PM2022-02-04T17:08:15+5:302022-02-04T17:08:18+5:30
मनपा आयुक्तांचे आदेश : ब्युटीपार्लरमध्ये हवी ५० टक्के उपस्थिती
साेलापूर : शहरात अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी जाहीर केले.
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी मनपा आयुक्तांनी जानेवारी महिन्यात शहरात काही निर्बंध लावले हाेते. यात शिथिलता देण्यात येत आहे. अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीचे निर्बंध हाेते. यात शिथिलता देण्यात आली आहे. ब्युटीपार्लर व केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेसह चालू ठेवण्यात यावीत. यात शिथिलता देण्यात आलेली नाही. ऑनलाइन तिकिटाची सुविधा असलेली उद्याने व पर्यटनस्थळे सुरू करण्यात यावीत. मात्र, काेराेना लसीचे दाेन डाेस घेतलेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
--
मनपाकडेच नाही ऑनलाइन सुविधा
आयुक्तांनी ऑनलाइन तिकीट विक्रीची सुविधा असलेली उद्याने खुली करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या एकाही उद्यानात ऑनलाइन तिकीट विक्रीची व्यवस्था नाही, असे उद्यानप्रमुख निशिकांत कांबळे यांनी सांगितले. आयुक्तांच्या आदेशाबद्दल आपण अनभिज्ञ असून, याबद्दल माहिती घेऊन उद्याने खुली करण्याचा निर्णय घेऊ, असे कांबळे यांनी सांगितले.