मोठी बातमी; ७ नोव्हेंबरला पंढरपुरात असणार संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 04:06 PM2020-11-05T16:06:31+5:302020-11-05T16:07:07+5:30
मराठा मोर्चानिमित्त एकत्र आल्यास दाखल होणार गुन्हा
पंढरपूर : सध्या सोलापूर जिल्हयासह पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई या मार्गाने काढण्यात येणाऱ्या पायी दिंडी आक्रोश मोर्चासाठी पंढरपुरात अनेक लोक जमतील. या शहरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मोर्चानिमित्त लोक एकत्र येऊ नये यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात ०६ नोव्हेंबर २०२० रोजी रात्रीचे १२ वा जल्यापासून ते ०७ नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनांचे वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी ७ नोव्हेंबरपासून पंढरपूर- अकलुज- बारामती- आकुर्डी- निगडी- मावळ- वाशी या मार्गाने मुंबई मंत्रालय पर्यंत पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढणेत येणार आहे.
पायी दिंडीत मराठा समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनांचे वतीने संघटनांनी आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात ३१४०४ व्यक्ती कोरोना बाधीत आहेत व ९१६ ठिकाणे ही प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून सध्या कार्यान्वित आहेत. सध्या कोरोना या संसर्गजन्य महामारीचे काळात मराठा आरक्षण मागणीसाठी संबंधित असलेल्या संघटनांनी मराठा समाजातील व्यक्तींना पंढरपूर येथे जमण्यासाठी जे आवाहन केलेले आहे. व त्यांचे वतीने पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई असा जो आक्रोश मोर्चा काढणेत येणार आहे. त्यानुसार पंढरपूर येथे आंदोलनकर्ते एकत्र जमल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढू शकतो. त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य व जिवितास धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे कोरोना या महामारीचा वाढलेला प्रसार व प्रादुर्भाव पाहता ७ नोव्हेंबरला आंदोलनकर्ते पंढरपूर मध्ये येऊ नयेत यासाठी साथरोग अधिनियम, १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत खालील बाबींना मनाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मलिंद शंभरकर यांनी सांगितले.
संचारबंदीचा असा आहे आदेश
महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरात दोन व दोन पेक्षा अधिक व्यक्तिना एकत्र येण्यास जमण्यास मनाई करण्यात येत आहे. व उक्त नमुद कालावधीत नामदेव पायरी दर्शन सर्वांसाठी बंद ठेवणेत येत आहे.
मराठा आरक्षण पायी दिंडी आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सहभागी होण्यासाठी येणारे आंदोलनकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दि. ०५.११.२०२० रोजी रात्रीचे १२.०० वाजल्यापासून ते ०७ नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यंत पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात येण्यास बंदी करण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०)
कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचेविरुध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पारीत केला आहे.