मोठी बातमी; दामाजी कारखान्याची अंतिम यादी जाहीर : जुलै महिन्यात मतदान होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 02:08 PM2022-05-17T14:08:53+5:302022-05-17T14:09:01+5:30
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीची २८ हजार ५३५ सभासदाची पक्की मतदार यादी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा ...
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीची २८ हजार ५३५ सभासदाची पक्की मतदार यादी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी प्रसिद्ध केली. कारखान्यासाठी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
कच्च्या मतदार यादीवर नोंदविण्यात आलेल्या हरकतींची निर्गत करण्यात आल्यानंतर पक्की यादी आज मंगळवारी दामाजी कारखाना , सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालय येथे जाहीर केली आहे. दरम्यान कच्या यादीतील जवळपास ७०० जणांना अपात्र करण्यात आले तर अपूर्ण शेअर्समुळे पूर्वी वगळलेल्या ३७८ जणांचा पक्क्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दामाजी साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम २८ मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत अंतिम घोषणा होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अर्ज स्वीकृती व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक कच्च्या मतदार यादीवर घेतलेल्या हरकतींबाबत निर्णय घेण्यात आला. यापैकी काही तांत्रिक स्वरूपाच्या म्हणजेच नाव-गावाच्या आणि संगणकीय दुरुस्तीबाबत होत्या. त्यांची निर्गत करण्यात आली आहे. तसेच उर्वरित हरकतींपैकी २५०० सभासदांना अपात्र ठरविण्याबाबतची एक हरकत फेटाळली. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाच्या निर्णयानंतर अपात्र सभासदांचा फैसला होणार याशिवाय कच्या यादीत ११२ संस्था मतदारांमध्ये पक्क्या यादीत ४८ वाढ झाली असून ते १६० संस्था गटातील मतदार पात्र ठरले आहेत. कच्च्या यादीतील सहा संस्था मतदार वगळण्यात आले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील अंतिम मतदार यादीतील गटनिहाय मतदान पुढीलप्रमाणे
--मंगळवेढा--४६३७ ,
ब्रह्मपुरी ६१४२,
मरवडे ६२००,
भोसे -६०३६,
आंधळगाव ५५२०
संस्था मतदार - १६०
एकूण - २८ हजार ५३५ मतदार आहेत
यामध्ये कच्या यादी पेक्षा पक्क्या यादीत ३७८ मतदान वाढले आहेत तर वय कमी असलेले व ३१ मार्च २०२० नंतर शेअर्स ट्रान्सफर केलेले असे जवळपास ७०० कच्या यादीतील सभासद अपात्र केले आहेत.
--------
निवडणूक कार्यालय मंगळवेढ्यात...
दामाजी साखर कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगळवेढा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवेढा येथे निवडणुक कार्यालय राहणार आहे.