मोठी बातमी; विठ्ठलाचे दर्शन २५ दिवस बंद; कोरोनामुळे मंदिर समितीने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:45 PM2021-04-05T12:45:01+5:302021-04-05T12:45:05+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
पंढरपूर : सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे ५ एप्रिल २०२१ (रात्री ८.००) ते ३० एप्रिल २०२१ (रात्री ११.५९) पर्यंत बंद ठेवण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. यामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यामुळे भाविकांना पुढील २५ दिवस विठ्ठलाचे दर्शन घेता येणार नाही.
सुरुवातीच्या कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता १७ मार्च २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत भाविकांना विठ्ठलचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबर २०२० पासून भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुन्हा राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर व मंदिर समितीच्या अधिपत्याखालील पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवतांची मंदिरे ५ एप्रिल २०२१ (रात्री ८.००) ते शुक्रवार ३० एप्रिल, २०२१ (रात्री ११.५९) या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहेत.
विठ्ठल सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. असे पत्रक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.