मोठी बातमी; झाडांचे वय मोजण्यासाठी सोलापूर विद्यापीठात डेण्ड्रोक्रॉनोलॉजी कॉर्नर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 07:43 PM2021-08-02T19:43:30+5:302021-08-02T19:43:40+5:30
अर्थसायन्स विभागाचा पुढाकार : रिंगपेपरच्या साह्याने ठरते वय
सोलापूर : एखाद्या झाडाचा मोठा बुंधा पाहिला तर ते झाड किती वयाचे आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी डेण्ड्रोक्रॉनोलॉजी ही शास्त्रीय पद्धत सर्वांत उपयुक्त समजली जाते. ही पद्धत आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थसायन्स विभागामध्ये वापरली जात आहे. झाडाचे वय ठरविण्यासाठी अर्थसायन्स विभागात डेण्ड्रोक्रॉनोलॉजी कॉर्नर सुरू करण्यात आला आहे.
सर्व झाडांमध्ये रिंग्ज (वर्तुळ) वाढण्याची क्षमता असते. प्रत्येक वर्तुळाचा संच, सामान्यत: एक गडद आणि एक प्रकाश, एकत्र एकाच वर्षाचे प्रतिनिधित्व करतो. झाडाच्या खोडाच्या सभोवताल झाडाच्या रिंगांची मोजणी करता येते. याद्वारे शेकडो वर्षांपासून त्या त्या परिसरातील पर्यावरणीय परिस्थितीबद्दल माहिती मिळते. एखाद्या वर्षी दुष्काळ असल्यास त्यावर्षी रिंग बारीक होते. तर मुसळधार पावसाळ्याच्या हंगामात वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या लाकडाची अधिक वाढ होऊ शकेल. तापमान आणि पर्जन्यमानातील हे बदल हवामान बदलांच्या प्रगतीचा अंदाज घेण्यास मदत करतात. तसेच परिसंस्थेमधील दीर्घकालीन बदलांचा संकेत म्हणूनदेखील काम करतात. काही आधुनिक संशोधक हवामान बदलांच्या दीर्घकालीन ट्रेंडचा मागोवा घेण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात.
असे निश्चित होते वय
डेण्ड्रोक्रॉनोलॉजी कॉर्नर झाडांचे काही बुंधे ठेवण्यात आले आहेत. या बुंध्यांना पॉलिश करण्यात आले आहे. बुंध्यावर ॲन्युअल पेपर ठेवण्यात येतो. हा पेपर फक्त फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडूनच अधिकृत संस्थेलाच देण्यात येतो. हा पेपर झाडाच्या बुंध्यावर ठेवून त्याद्वारे वर्तुळ मोजण्यात येतात. एक वर्तुळ हा एक वर्ष असल्याचे दर्शवतो. बुंध्यावर जितके वर्तुळ असतात तितक्या वर्षांचे झाड असल्याचे स्पष्ट होते.
अर्थसायन्स विभागामध्ये झाडांचे वय ठरविण्यासाठी डेण्ड्रोक्रॉनोलॉजी कॉर्नर सुरू करण्यात आला आहे. झाडांच्या खोडामध्ये असलेले वर्तुळ मोेजून ते झाड किती वर्षे जुने आहे, हे ठरवता येते. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून ॲन्युअल रिंग पेपर मागविण्यात आला आहे. त्याचा वापर करून फक्त झाडच नव्हे तर त्यावेळेच्या परिस्थितीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
- डॉ. विनायक धुळप, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख