मोठी बातमी; कोजागिरी पाैर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्यास भाविकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 04:59 PM2021-10-13T16:59:50+5:302021-10-13T16:59:57+5:30
पोलीस अधीक्षकांची माहिती; बॉर्डरवरून भाविकांना पोलीस परत पाठविणार
सोलापूर : कोरोनाचे सावट कमी होत असले तरी ते आणखीन वाढू नये यासाठी काळजी घेत आहोत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या नियमानुसार यंदाही कोजागिरी पाैर्णिमेला पायी चालत जाण्यास भाविकांना परवानगी नसणार आहे. जे भाविक जातील त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर थांबवून त्यांना पुढे न जाण्याची विनंती करून त्यांना परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता यंदाचा नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा त्यावर बंदी घालण्यात आली असून तसे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
----------
उस्मानाबादचे आदेश मिळतील...
शेजारील जिल्ह्यातून कोणत्याही व्यक्तीला नवरात्र महोत्सवासाठी परवानगी देऊ नये. कोजागिरी पाैर्णिमेला पायी चालत जात असलेल्या भाविकांना रोखावे असे आदेश लवकरच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होतील. त्यानुसार शेजारील राज्यांनाही यासंदर्भात कळविण्यात येईल असेही सातपुते यांनी सांगितले. एसटी, रेल्वेने परराज्यातून येणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेवण्यात येईल.
-----------
पोलीस बंदोबस्त तैनात करणार
तुळजापुरात कोजागिरी पाैर्णिमेला गर्दी होऊ नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांना जिल्ह्याच्या बॉर्डरवर रोखण्यात येणार आहे. तुळजापूर रस्त्यावर तामलवाडीपर्यंत ग्रामीण पोलीस दलाकडून कोजागिरीच्या दोन दिवसांआधी विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून भाविकांना तुळजापूरला पायी चालत जाण्यापासून रोखण्यात येणार आहे.
---------
तुळजापुरात कोजागिरी पाैर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांची संचारबंदी असणार आहे. त्याबाबतचे पत्र लवकरच उस्मानाबादकडून सोलापूरला प्राप्त होईल. भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. घरातच पूजा, अर्चा करून कोजागिरी पाैर्णिमा साजरी करावी. पायी चालत जाऊ नये. पायी चालत जाणाऱ्या भाविकांना जिल्ह्याच्या बॉर्डरवर अडविण्यात येईल.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.