मोठी बातमी; थकबाकीमुळे सोलापूर शहरातील ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:42 PM2021-06-25T16:42:53+5:302021-06-25T16:47:04+5:30

महावितरणची वसुली मोहीम वेगात - ९७ हजार ग्राहकांकडे थकले ५२ कोटींचे वीज बिल

Big news; Due to arrears, power supply to 6,000 customers in Solapur city was disrupted | मोठी बातमी; थकबाकीमुळे सोलापूर शहरातील ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

मोठी बातमी; थकबाकीमुळे सोलापूर शहरातील ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

सोलापूर - वारंवार आवाहन करूनही वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई ‘महावितरण’ने सुरू केली आहे. शहरातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडील ६ कोटी ७० लाखांच्या थकबाकीपोटी ५ हजार ३८५ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन पुकारले होते. त्यामुळे महावितरण कंपनीने एका महिन्यांचे वीज बिल घरपोच दिले नाहीत, त्यानंतर दोन महिन्यांचे एकत्रित बिल आल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे शिवाय वीजबिल वाढीव आल्याने अनेक ग्राहकांनी ‘महावितरण’कडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महावितरणकडून प्रत्येक तक्रारींचे निरसन करून प्रत्येक ग्राहकाला अचूक बिल देण्यात येत असल्याचेही शहर अभियंता दिघे यांनी सांगितले.

...अन्यथा गुन्हे दाखल होणार...

‘महावितरण’च्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत. त्याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१०० ग्राहकांचे मीटर काढले...

वारंवार सांगूनही वीजबिल भरण्यास नकार देणार्या वीज ग्राहकांच्या घरातील मीटर ‘महावितरण’कडून काढण्यात आले आहे. २४ लाख ११ हजार रूपयांच्या थकबाकीपोटी १०० ग्राहकांचे मीटर काढण्यात आल्याचे महावितरण प्रशासनाने सांगितले.

वसुलीसाठी महावितरणची विशेष पथके...

सोलापूर शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांकडे ५१ काेटी ३८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ९७ हजार २१४ ग्राहकांनी वीज भरण्यास नकार दिला आहे. महावितरणने वसुलीसाठी विविध पथके तयार केली असून या पथकाकडून नियमित वीज वसुलीची तीव्र मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज खंडित करण्यात येत आहे.

 

थकबाकी भरून वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे. ज्या ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी असतील त्यांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात जाऊन बिलांची दुरूस्ती करून अचूक बिले घ्यावीत. ज्यादा बिले असतील तर हप्ताची सोय करून देण्यात येईल. वीज बिल भरा अन् वीजतोडणीची कारवाई टाळा.

- चंद्रकांत दिघे, शहर अभियंता, महावितरण, सोलापूर

 

 

Web Title: Big news; Due to arrears, power supply to 6,000 customers in Solapur city was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.