मोठी बातमी; शासनाचे नियंत्रण नसल्याने आठ महिन्यांत बदलला ८ वेळा दूध खरेदीचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 03:58 PM2022-08-24T15:58:48+5:302022-08-24T15:58:51+5:30

शासनाचे नियंत्रण नसलेल्या दुधाचे दर एक-दोन लोक ठरवितात

big news; Due to lack of government control, milk purchase rate changed 8 times in eight months | मोठी बातमी; शासनाचे नियंत्रण नसल्याने आठ महिन्यांत बदलला ८ वेळा दूध खरेदीचा दर

मोठी बातमी; शासनाचे नियंत्रण नसल्याने आठ महिन्यांत बदलला ८ वेळा दूध खरेदीचा दर

Next

सोलापूर : शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या दूध खरेदी दरात मागील ८ महिन्यांत ८ वेळा दूध बदल झाला आहे. भाजीपाल्याप्रमाणेच दुधाचेही दर सातत्याने बदलत असल्याने दूध व्यवसायही बेभरवशाचा ठरू लागला आहे. विशेष म्हणजे शासनाचे कसलेच नियंत्रण राहिले नसल्याने दूध व्यवसाय खासगी व्यावसायिकांच्या ताब्यात गेला आहे.

शेती उत्पादनासाठीच्या खर्चात मोठी वाढ झाली, मात्र मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती आतबट्ट्याची ठरत आहे. यामुळेच शेतकरी दूध धंदा व्यवसाय म्हणून करीत आहेत. संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस जनावरांसाठी वैरण व संगोपनासाठी राबत असते. कासवाच्या वेगाने दूध दर वाढत असताना पशुखाद्याचे दर मात्र सशाच्या वेगाने वाढत आहेत. काही दिवस उलटले की दूध खरेदी दर कमी केले जातात, मात्र पशुखाद्याचे दर मात्र वाढतच राहतात.

यामुळे दूध उत्पादनातून शेतकरी सधन होताना दिसत नाहीत. जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत दूध खरेदी दरात ८ वेळा बदल झाला आहे. भाजीपाल्याचे दर जसे दररोज बदलतात तसेच दूध खरेदी दरातही बदल होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. देशात दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात सरकारचे नियंत्रण नसल्याने दूध व्यवसाय पूर्णपणे खासगी व्यक्तींच्या हातात गेला आहे. शेतकरी मात्र या खासगी डेअऱ्यांवर अवलंबून आहे.

२६ ते ३५ रुपये दर

सोलापूर जिल्ह्यात १ जानेवारी रोजी गाय दूध खरेदी दर प्रति लिटर २६ रुपये होता. फेब्रुवारी महिन्यात दर १० दिवसांनी दरवाढ होत १ मार्च रोजी तो २७ रुपये ५० पैसे झाला. १ मार्च रोजी प्रति लिटर ३३ तर ५ मेपासून ३५ रुपयांवर दर वाढला. १५ मे रोजी पुन्हा दर एक रुपयाने घसरून ३३ रुपयांवर आला होता. १ जुलै रोजी पुन्हा गुणप्रतीनुसार दरात बदल झाले. आता २१ ऑगस्टपासून दूध खरेदी दरात २ रुपयांनी वाढ होत ३५ रुपये दर झाला आहे. राज्यातही थोड्याफार फरकाने हेच दर आहेत.

------------

आता काही महिने दूध खरेदी दर स्थिर राहतील असे वाटते. राज्यभरातील दूध खरेदी दर सहा महिन्यांनी, वर्षभराने बदलण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. सध्या पावडर प्रकल्प मालक दूध खरेदी दर ठरवीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही व दूध ग्राहकांनाही योग्य दरात दूध मिळत नाही. अमुल दूध डेअरीचा दूध खरेदी दर जानेवारीपासून प्रति लिटर ३५ रुपयेच आहे.

- प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक कल्याणकारी संघ

आमची परवड कधी थांबणार: रणजितसिंह

दूध संकलन वाढवावे म्हटले तर खासगी दूध संघ स्पर्धा करुन आमचे गुणवत्तेचे दूध असतानाही अडचणीत आणतात. पॅकिंग फ्री पिशव्या देऊन वितरकांना भुरळ घालतात. दूध खरेदी दर खासगी प्रकल्प चालक ठरवितात. त्यामुळे सहकारी दूध संघ नियोजन करुन व्यवसाय करु शकत नाहीत. राज्य शासनाने पुढाकार घेतला तर शेतकरी जगेल असे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.

Web Title: big news; Due to lack of government control, milk purchase rate changed 8 times in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.